Sunday 11 March 2018

माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग तिन

दुसरा दिवस : ' Mountains are calling & I can't wait ' असल भारी वाक्य WhatsApp status म्हणून अपलोड करुन मी ट्रेकसाठी घरून निघालो होतो. परंतु जेव्हा पर्वत आपली परिक्षा घ्यायच ठरवतात तेव्हा आपल नेमक काय होत हे आम्हाला आज कळनार होत. 
दिनांक 17 मे 2017 या दिवशी सकाळी तयार होऊन आणी दुपारचे जेवण सोबत घेऊन आम्ही बाहेर पडलोत. 47 ट्रेकर्स मधिल काही पहिल्या दिवसाच्या चालण्यानेच प्रचंड थकले होते. त्यांना गाडीने रात्रीच्या मुक्कामी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी ठिक 7.00 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली आणि टम्बलिंग सोडल. धुक निवळल होत आणि स्वंच्छ सूर्यप्रकाश पडला होता. काल रात्री दाट धुक्यात इथे पोहचलो तेव्हा मी दमुन रस्त्याच्या कडेला बसलो होतो. सकाळी ती जागा पाहिली तेव्हा भितीने उडालोच. प्रचंड खोल आणि विस्तीर्ण दरी रस्त्याला लागुन होती आणि मी रात्री चंक्क तिच्यात पाय टाकून बसलो होतो. 'नजर हटी, दुर्घटना घटी' ' कशाला म्हणतात हे मला तेव्हा जाणवले. 
आम्ही आज हिमालयातील ज्या वळनावळनाच्या रसत्याने जात होतो तोच रस्ता भारत आणि नेपाळ या दोन देशांना वेगळ करणारी सीमारेषा होती. हे ऐकून गंमत वाटली. जावेद अख्तर यांच्या ओळी सहजपणे आठवल्यात "पंछि नदिया पवनके झोके, कोइ सरहद्द क्या इन्हे रोके '. 
साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर आम्हाला BSF चि एक चैकी लागली. भारत आणि नेपाळ सिमेवर पसरलेल्या सिंगालिला नॅशनल पार्कची ती चेकपोस्ट होती. तेथील एका हसतमुख भारतीय अधिकाऱ्याने आमचे स्वागत केले. येथे आमची प्रार्थमिक चौकशी करण्यात आली. येथे फोटो काढण्यास मनाई असुनही काही महाभागांनी ते काढलेच. (त्यातला एक मी देखील होतो.)
सिंगालिला नॅशनल पार्क हे हिमालयातील वनस्पतींसाठी आणि रेड पांडा या दुर्मिळ प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्हाला रेड पांडा पहाण्याची उत्सुकता होती परंतु वंन्यप्राणी हे अतीशय सजग असतात. थोडीदेखील चाहूल किंवा वास ते चटकन टिपू शकतात. छलावरण तर असे की बर्याचदा समोर असुन देखील आपण त्यांना ओळखू शकत नाही. शिवाय आमचा समुह मोठा होता आणि चालण्यातून निर्माण होणारी कंप्पन ही वंन्यजीवांना सहज जाणवनार होती. तसेच आजच अंतर जास्त असल्याने भरभर चालन गरजेच होत. 
वळनवाटा घेतांना सुरवातीला आम्हाला उतार लागत होता. काही ठिकाणी तर उतार एवढा तीव्र होता कि चालण सोडून चंक्क धावावे लागत होते. परंतु ट्रेकिंग करतांना उतारावरच अधिक काळजी घ्यावी लागते. पाठीवरील बॅगचा आणि संपुर्ण शरिराचा भार हा गुडघे आणि पावलांवर येत असतो आणि अशातच वेगाने उतरतांना पाउल तिरप पडल तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. काही अतिउत्साही ट्रेकर्स हसत खिदळत उतरत होते. परंतु त्यांना हे कदाचित माहित नसावे 'जो रास्ता निचे जाता है वही उपरभीतो आता है.' 
आज सकाळपासून सुर्यदेव आमच्यावर खुष होते. आम्ही समुद्रसपाटीपासून 2500 मीटर उंचीवर चालत होतो तेव्हा गारवा हा असणारच होता. परंतु चालल्याने शरिर गरम रहात होते. सकाळचे 10.00 वाजायला आलेत. आम्ही मागच्या तिन तासांपासून एकसारखे चालत होतो. माझ्या पाठीवरली बॅगमध्ये खाण्याचा सामान आणि दोन तीन पाण्याच्या बाटल्या असल्याने वजन जरा जास्तच होत. आणि अशातच एका उतारावर माझ्या उजव्या पायाच्या पोटरित जोराची कळ आली. वेदनेने मी विव्हळलो. पाय जमिनीवर टेकवत नव्हता. कसातरी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसलो. सकाळपासून वेगाने चालण्याच्या नादात हव तेवढ पाणी पिणे झाले नव्हते. मला बसलेल पाहून सोबत चालणारे अभिषेक, दर्शन, सुजीत हे धावतच आले. 
पायात अशी कळ येणे हि ट्रेकिंग करतांना नेहमी घडणारी गोष्ट आहे. बर्याच वेळा शरिरातल पाणी आणि क्षार कमी झाल्याने हे घडत. अशा वेळी काय करावे हे सह्याद्रीतल्या ट्रेकमधून आम्ही शिकलो होतो. मी पटकन बॅगमध्ये होते तेवढे सर्व चॉकलेट खाऊन टाकले आणि सोबत बाटलीभर पाणी प्यालो. पाच मिनिटात पुन्हा एकदा ओके होउन चालायला लागलो. 
दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही फार थकलो होतो. पोटात भुक मावत नव्हती. काही अंतरावर घर दिसायला लागलीत. आम्ही झपाटय़ाने पावल उचललीत आणि तिथे पोहचलो. समोर विस्तीर्ण दरि पसरली होती. दरिच्या मधोमध एक पुल होता. पुलाला लागूनच होते BSF चे चेक पोस्ट. समोर दोन हॉटेल्स होती. आमचा सर्व ग्रूप एकाच हाॅटेलवर मेहरबान झाला म्हणून आम्ही पाच सहा ट्रेकर्स दुसर्‍या हॉटेलात शिरलो. तीथे मोमोज आणि वाई वाई हा स्थानिक नूडल्सचा प्रकार सनकुन हानला. जेवनाचा डबा खाण्यात कुणालाही रस नव्हता कारण त्यात होती अर्धि शिजलेली बटाट्याची भाजी आणि तांदळाची पुरी. मागचे तीन दिवस तिन वेळेला आम्ही हेच पदार्थ खात होतो आणि त्याआधी रेल्वेच्या प्रवासात काहिंनी खराब होत नाही म्हणून बटाट्याचीच भाजी आणली होती.
जेवण आटोपून आम्ही पुन्हा एकदा बॅग्ज पाठीवर चाढविल्यात आणि चालायला तयार झालोत. काही पठ्ठे काही केल्या उठायचे नावच घेइनात. याला दोन कारण होती एक म्हणजे सकाळपासून चालल्याने बरेच जण थकले होते आणि दुसरे म्हणजे उतार संपुण पहाडावर चढनारी आमची वाट आम्हाला स्पष्ट दिसत होती. खरा कस लागणार होता तो इथे. काही मावळे प्रवासातच एवढे थकले होते की प्रत्यक्ष लढाईच्या वेळी त्यांनी नांग्याच टाकल्यात. आम्हाला काहीही करुन अंधार होण्याच्या आत मुक्कांमाच्या ठिकाणी पोहोचायचे होते. नाहितरी 'इस तरहके बिहडोमे सही हुनरके बिना आप एक रातभी जिंदा नही रेह सकते हे बेअर ग्रिल्सचे वाक्य आम्ही टवाळी म्हणून उच्चारतच होतो. शेवटी आमचा गाईड राजन याने अंधार पडण्याची दाखविलेली भिती कामी आली आणि ट्रेकिंगची केवळ बढाई मारणारे मावळे अखेर चढाईस तयार झाले. 
आता रस्ता तिव्र चढाचा होता आणि थोडे देखिल चालले तरी धाप लागत होती. मजल दरजल करत कासवाच्या गतीने आम्ही वर सरकू लागलो तस रान मोकळ होऊ लागल. आणि हिमालयातील निसर्गाच्या त्या चमत्कारिक नजार्यानी सकाळपासून बॅगेत असलेला कॅमेरा बाहेर काढण्यास भाग पाडले. दूरवर पसरलेल्या हिमालयातील पर्वत रांगा, पावसाळ्यातिल गवताप्रमाने दाटिने उगवलेल जंगल, त्याच जगलात अडकल्यासारखे भासणारे कापसाच्या बोळ्यासारखे शुभ्र ढघ, पहाडांवरुन वळण घेत उतरणार्‍या पायवाटा, ख्रिसमसट्रीच्या आकाराची उंचच उंच झाड सार काही स्वप्नवत. 
मग काय थकले भागले मावळे पुन्हा जोशात आले ना भाऊ. व्यावसायिक मॉडेललाही लाजवेल असले फोटोसेशन सुर झाले. आधि गाॅगल लावलेला, मग गॉगल लाउन टोपी घातलेला, मग गॉगल लाउन टोपी घालून मफ्लर गुंडाळलेला एक एक फोटो निघू लागला तर तिकडे महिला मंडळ सेल्फी काढण्यात मग्न 'आखीर सवाल प्रोफाईल पींचर का था मेरे भाई'. (यातुन मि देखील सुटलो नाही हे पुन्हा वेगळे सांगायला नको) 
दुपारी 4.00 वाजेच्या सुमारास अतिशय दाट धुक पडल. गारवाही चांगलाच जाणवू लागला. रस्ता काही केल्या संपत नव्हता. रस्त्यावरच पुढे एका वळणावर BSF चा कॅम्प दिसू लगला. आम्ही त्याच्यापुढे काही अंतर जाउन उभे राहिलो. तिथेच काही अंतरावर एक जवान उभा होता. त्याच्याशी बोलताना कळले की तो मुळचा उत्तर प्रदेशचा होता आणि येथे मागील तिन वर्षांपासून तैनात होता. या अतिशय निर्मनुष्य आणि दुर्गम ठिकाणी जिथे मोबाईलला रेंज नाही, करमणुकीचे कुठले साधन नाही आमच्यातले काही एका दिवसात वैतागले होते. तेथे हे जवान आपल्या परिवरापासुन वर्षानुवर्ष लांब राहुन खडा पहारा देत होते. हे सारे ऐकणे वाचणे आणि अनुभवने यात प्रचंड तफावत आहे. ज्या भावना त्या वेळी भारतीय सेनेप्रती वाटल्यात त्या शब्दातीत आहेत. 
आमच पाणी आणि खाद्यपदार्थ आता संपले होते. आम्ही अतिशय थकलो होतो आणि एक एक पाऊल पुढे टाकणेही कठीण झाले होते. त्यात दररोज चालण्याची सवय असलेले अजुन टिकून होते परंतु पहिल्यांदाच एवढे चालनार्याची अवस्था वाईट होती. काही मुलीनी तर 'कितना बाकी है, कितना बाकी है 'हे विचारून विचारून राजनला भंडाऊन सोडले होते. तरीही तो बिचारा बुद्धांच्या चेहर्‍यावरील शांत भावाने सांगत होता' बश थोडाशा बाकी है, थोडाशा'. 
आम्ही पुढे चालनार्यात होतो. काही ट्रेकर्स दोन किलोमीटर पर्यंत मागे राहिले होते. राजन त्यांच्यासाठी थांबला होता. जंगली फुलांनी बहरलेल एक वळन आम्ही ओलांडल आणि समोर पाउलाचा आकाराचा ठसा असावा तस पाण्याने काठोकाठ भरलेल तळ आम्हाला दिसल. त्याच्यात लगोरीसारखे दगडांचे थर रचून ठेवले होत आणि बैद्ध धर्मस्थळी आढळनारे रंगीत झेडेंं अवतीभवती लावले होते. हे तळ बुद्धांच्या पायाच्या ठस्याने निर्माण झाले आहे अशि स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. याच ठीकाणाला नेपाळी भाषेत काली म्हणजे काळ आणि पोखरी म्हणजे तळ म्हणतात. आमच्या मुक्कामाचे ठिकाण हे कालीपोखरीच होते म्हणजे नक्कीच येथे जवळपास वस्ती असणार होती. तेथून एक चढ चढुन लगेच दहा बारा लाकडी घरांच कालीपोखरी हे गाव दिसल. पोहचलो एकदाचे म्हणत आम्ही खुष झालोत. 
आजचा मुक्काम देखिल एका लाकडी घरातच होता. ताजेतवाने होउन आम्ही हॉलमध्ये चहा घेण्यासाठी जमलो. हॉल लहान असल्याने चहा कपात घेऊन आम्ही बाहेर आलो तर बाहेर लंख्ख सूर्यप्रकाश पसरला होता. पहाडांमध्ये क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण आम्ही अनुभवत होतो. दुरवरपर्यत क्षितिज दिसत होत आणि पश्चिमेला पहाडांच्यामागे सुर्य मावळत होता. सगळीकडे पिवळसर प्रकाश पसरला होता. एवढा सुंदर सुर्यास्त मी पहिल्यांदाच पहात होतो. 
शारिरीक श्रमानीं आणि तिव्र थंडीने आमच्यातले बरेच लोक आजारी पडले होते. काही शरीराने हरले होते तर काही मनाने. माझ्यासारखे काही मात्र तो प्रवास, ते ठिकाण, ती रात्र, ते चांदण, ती माणस याचां आनंद घेण्यात गुंतली होती. कारण आम्हाला ठाउक होत की हे दिवस अयुष्यातले अविस्मरणीय दिवस ठरणार आहेत.
रात्रीच्या 5 ते 6 अंश तापमानात बाहेर आम्ही शेकोटीच्या भवती बसलोत. सुजीत जवळ अगदि बेअर ग्रिल्सकडे असते तसेच 
एल्युमिनियमचे मोठे पात्र होते त्यात शेकोटिवर पाणी गरम करुन आम्ही लेमन टी बनवली आणि शेकोटीच्या भवतीच गाणी गात तिचा अस्वाद घेतला. 47 लोकांचा समूहात आताशा आमचे समविचारी लोकांचे उपसमूह तयार व्हायला लागले होते. रात्री झोपताना आजच्या दिवसभराचा थरार आठवत होतो आणि उत्सुकता होती उद्याच्या दिवसाची. कारण उद्या आम्ही पाहणार होतो Top of the world... *MOUNT EVEREST*

No comments:

Post a Comment

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...