Sunday 11 March 2018

माझे ट्रेकानूभव... संदकफू डायरी... भाग एक

काॅलेजला असतांना एकदा पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलवर सुजीत या मित्राच्या रुमला पॅरासाईट म्हणून राहण्याचा योग आला होता. तिथे काही मित्रांनी पुरंदरवरील ट्रेकिंगचा बेत आखला होता तेंव्हा सहज म्हणून आम्हीही त्या प्लॅनमध्ये सहभागी झालोत. अॉगस्ट महीण्यातील भर पावसातला तो ट्रेकिंगचा थरारक अनुभव माझ्या मनात खोलवर कोरला गेला. ट्रेकिंगची ती झिंग गेले आठ वर्षे झालीत काही उतरत नाहीये आणि यातच मग मी आणि सुजीतने मिळून सह्याद्रीतली अनेक ठिकाणे पिंजून काढली आहेत.
ज्याप्रमाणे गल्लीत क्रिकेट खेळणार प्रत्येक पोर हे भारताच्या टिमकडून खेळन्याच स्वप्न पहात अगदी त्याच सहजतेने सह्याद्रीत फिरणारे ट्रेकर्स हिमालयाच स्वप्न आपल्या उराशी बाळगून असतात. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील सर्वच ट्रेकर्ससाठी हिमालय हा स्वर्ग आहे. अवघ्या जगातले कितीतरी ट्रेकर्स नचुकता दरवर्षी हिमालयाची वारी करित असतात. किंबहुना हिमालय हा फक्त ट्रेकिंगसाठीच आहे हा (गैर) समज मी गेली कित्येक वर्षे बाळगून आहे.
हिमालयातल्या त्या भंव्य विस्तीर्ण रांगा, संपूर्ण देश आपल्या अंगावर वसवनारी त्याची व्याप्ती, जागतिक पहिल्या दहा मधिल नऊ शिखरे बाळगनारि त्याची उंची, त्याच्यावर आढळणारी जैवविविधता, गंगे सारख्या महानद्या निर्माण करणार्‍या त्याचा दरी आणि काश्मीर पासुन तिबेट पर्यंत सांस्कृतिक वैविध्यतेने त्याच्यावर राहणारी माणस या सार्याच्या प्रती मला प्रचंड आकर्षण आहे. कधीतरी हिमालयात जायला मिळाव हे स्वप्न मी देखील उराशी बाळगून होतो आणि 2017 चा उन्हाळा ही संधी आमच्यासाठी घेऊन आलाच.
"इतनी शिद्दतसे तुम्हे पानेकी कोशिश कि है के हरइक जरै ने मुझे तुमसे मिलाने की साजिश कि है" अगदी शाहरुख खानच्या या शेराची प्रचिती यावी तसे दर्शन या माझ्या मित्राचा अचानक एक दिवस फोन आला. Youth hostel association of India च्या धुळे युनिट च्या वतीने दार्जिलिंग नजिकच्या संदकफू या ठिकाणच्या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. मग काय मागचा पुढचा विचार नकरता मी लगेचच हो म्हणालो आणि सुजीतला फोन केला तो तर माझ वाक्य संपण्याच्या आधीच हो म्हणाला. त्याच दिवशी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही लागलीच पैसे भरून टाकलेत आणि अतुरतेने वाट पाहू लागलो 13 मे 2017 या दिवसाची.
13 मे 2017 या दिवशी आमच्या 47 लोकांच्या टीमने कलकत्त्याला जाणारी शिर्डी हावडा ही रेल्वे गाठली आणि मनमाड रेल्वे स्थानकावरून आमची आगेकूच सुरू झाली. 28 तासाचा प्रवास करून आम्ही 14 मे ला रात्री 8.30ला हावडा स्टेशनला पोहचलो. तिथुन 18तासाचा लक्झरी बसने प्रवास करून सिलीगुडी हे ठिकाण गाठले आणि तेथून अंदाजे 75 किमी लांब असलेल्या दार्जिलिंच्या वाटेला लागलो. सिलीगुडी सोडताच आमच्या समोर उभा होता प्रचंड मोठा असा हिमालय. या पर्वतराजच्या
प्रथम दर्शनानेच सरकण अंगावर काटा आला. भूगोलात अभ्यासलेला, चित्रपटात पाहीलेला आणि NET GEO, DISCOVERY या वाहिनीवरून जवळपास रोजच भेटणारा हिमालय साक्षात माझ्या समोर उभा होता. जसजसा आमच्या गाडीने वळनावळनाचा घाटाचा रस्ता सुरू केला तसतसा तो पर्वतराज आपल्या पोटातली निसर्गसौंदर्याने नटलेली एक एक रत्ने बाहेर काढू लागला. प्रत्येक द्रूष्यागणिक गाडीतील मुली वॉव वॉव म्हणत चंक्क किंचाळूच लागल्यात. थोडक्यात कवठे बुद्रुक या गावाच्या बाहेर कधिही न गेलेल्या व्यक्तीला जर डायरेक्ट पॅरिसला नेले तर त्याचे जे काही होईल ते आमचे होत होते. संध्याकाळी 5.00 वाजेच्या सुमारास आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने घाटातीलच एका लहानशा टुमदार हॉटेल बाहेर गाडी थांबवली. आम्ही आत जाऊन बसलो तिथे काही चेहर्‍यावरून स्थानिक वाटणारी मुल मोठ्या आवडिन पाढराशुभ्र सांजोरी सारखा दिसणारा पदार्थ मोठ्या आवडीने खात होते. आम्ही देखिल तोच पदार्थ मागविला. बारिक चिरलेली कोबी आणि कांदा यांच पुरण तांदळाच्या पुड मधे भरून उकडीच्या मोदकासारखा वाफवलेला त्या पदार्थाचे नाव होते 'मोमोज'. सकाळ पासून उपाशी असलेलो आम्ही तिन चार प्लेट मोमोज आणि पुरीभाजी खाऊन जेव्हा बिल द्यायला गेलोत तेव्हा हॉटेलची मालकीण ही 'हे नेमके अफ्रिकेच्या कुठल्याशा दुष्काळी देशातून आले असावेत' या अविर्भावात आमच्या कडे पाहत होती.
खान संपवून पुन्हा एकदा दार्जिलिंच्या वाटेवर लागलोत. काही अंतर गेल्यावर हिमालयाच्या उतारावर वसलेले कुरसांग हे गाव लागल जिथून रस्त्याच्या बरोबरीने जाणारा रेल्वे रूळ सुरू झाला आणि मला आठवल राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित आराधना चित्रपटातील किशोरदा यांनी गायलेले गित "मेरे सपनोकि रानी कब आयेगी तू" या गिताच याच मार्गाने चित्रिकरण झाले होते हे मी नेटवर वाचून सर्वांना सागितले ड्रायव्हरने देखिल होकार भरला आणि काही काळ ते गित चंक्क डोळ्यासमोर उभ राहील. दार्जिलिंग हे शहर आल तेव्हा जवळपास अंधार पडला होता या शहरात आमच स्वागत झाल ते ट्राफिक जॉमन. संपूर्णपणे पहाडावर वसलेले हे शहर सुंदर आहे परंतु पर्यटकांची आणि वाहनांची प्रमाणाबाहेर गर्दी या शहरात जाणवली. अतिशय उंंच्चावर वसलेल्या आमच्या 'सिल्व्हर कॅसटल' या हॉटेलात आम्ही पोहचलो तेव्हा रात्रीचे 9.00 वाजले होते. साधारणपणे 60 तासाचा दमवनारा प्रवास करून आम्ही येथे पोहचलो होतो. ऐन उन्हाळ्यातला तो 15 मे हा दिवस होता आणि दार्जिलिंग या ठिकाणी चक्क अंग गोठवनारी थंडी पडली होती. रात्री आम्ही पटकन जेवण करुन झोपण्यापूर्वी बॅग्स लावुन घेतल्या. जास्तीचा सामान येथेच सोडून आम्हाला अतिशय कमी कपडे आणि खाद्यपदार्थ घेऊन ट्रेकला निघायचे होते.
दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या ट्रेकची खरि सुरवात होणार होती. येणारे पाच दिवस आमच्या शरीराची कसोटी पाहणारे ठरणार होत. या पाच दिवसांत आम्हाला हिमालयाच्या जंगलातून दर्याखोर्यातून अंदाजे 50 किमी अंतर कापायचे होते आणि आम्ही पोहचणार होतो बंगाल मधिल सर्वात उंच ठिकाणी 'संदकफू' येथे. ज्याची उंची आहे 3636 मिटर्स म्हणजेच म्हणजेच कळसूबाई (1646)पेक्षा 2000 मिटर्स उंचीवर. आमच्यातले बरेच एवढ्या लांबच्या प्रवासाने थकले होते परंतु आमच्यातील कुणालाही माहीत नव्हते की उद्यापासून अतिशय थकविनारा, अंत पाहणारा परंतु तेवढाच जिवंत आणि थरारक अनुभव आमची वाट पाहत उभा आहे...
*To Be Continued...*

No comments:

Post a Comment

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...