ह .भ. प कुणी मला म्हणाले कशास आपण जन्मा आले
दानधर्म ना पुण्य कर्म ना , असेच किती जन्म जाहले
जगता आपण ऐसे जैसे स्वर्ग आपल्या खिशात आहे
किंवा मजला सांगुनी टाका स्वर्ग आपला कशात आहे.
ऐकून त्यांची कुत्सित वाणी मीही झालो पाणी पाणी
विवेक सारा बाजूस ठेवून उत्कटतेने म्हणालो आणि ...
स्वर्ग उमदं राहण्यात आहे
स्वर्ग विसरून जाण्यात आहे
नजरानजर होताच कुठे
स्वर्ग लाजून पाहण्यात आहे
स्वर्ग कवीच्या ओठात आहे
स्वरगंगेच्या काठात आहे
गुलाब ,जाई फुलविणाऱ्या
माळावरल्या पाटात आहे
स्वर्ग नाकाच्या नथीत आहे
स्वर्ग समईच्या वातीत आहे
कन घेऊन कणीस देत्या
स्वर्ग काळ्या मातीत आहे
स्वर्ग दोन देण्यात आहे
स्वर्ग दोन खाण्यात आहे
निर्ढावलेल्या मुजोरांना
छातीवरती घेण्यात आहे
स्वर्ग वरातीत नाचण्यात आहे
स्वर्ग मनमुराद हसण्यात आहे
तळीरामांच्या गप्पा ऐकत
चकणा खात बसण्यात आहे
स्वर्ग आमटीच्या झुरक्यात आहे
स्वर्ग भाकरी आणि झुणक्यात आहे
दोन खापात कांदा फोडणाऱ्या
तळहाताच्या दणक्यात आहे
स्वर्ग शनिवार वाड्यात आहे
शिवरायांच्या पोवाड्यात आहे
कुस्ती आणि लावणी वरच्या
महाराष्ट्राच्या वेडात आहे
स्वर्ग अप्सरा आलीत आहे
ओठावरल्या लालीत आहे
काळजाच्या ठाव घेत्या
मादक मोहक चालित आहे
स्वर्ग कधी प्रारब्धात आहे
गतकाळाच्या गद्यात आहे
जगण्यावरती प्रेम करत्या
पाडगावकरांच्या शब्दात आहे
स्वर्ग पुस्तकाच्या गंधात आहे
वाचनाच्या बंधात आहे
वाचता वाचता लिहीत करंत्या
कवितेच्या छंदात आहे
स्वर्ग देत राहण्यात आहे
हृदयगीत गाण्यात आहे
मिळुनी साऱ्या रंगामध्ये
पाण्यासारखे वाहण्यात आहे
तुटण्यापूर्वी तगण्यात आहे
विझण्यापूर्वी धगन्यात आहे
स्वर्गाच्या इच्छेत मरण्याआधी
स्वर्ग बेधुंद जगण्यात आहे
विनय पाटील
१७/०१/२०१६
No comments:
Post a Comment