Sunday, 11 March 2018

माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग सहा

पाचवा दिवस :
"उगवतिचे ऊन आता मावळतिला पोहचले आहे
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे,
तक्रार नाही खंत नाही संपण्यासाठीच प्रवास असतो
एक दिवस मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो... "
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळींना स्मरुण मी ट्रेकच्या आजच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात केली. पाच दिवसांपुर्वी सुरू झालेला आमच्या ट्रेकचा उगवतीचा प्रवास आज मावळतिला झुकला होता. गुरदुंग या स्वर्गीय सैदर्याने नटलेल्या ठिकाणाहून पाय निघत नव्हता परंतु हाती कितिही सुंदर आणि सुखद गोष्टी असल्यात तरी त्या सोडून देण्याशिवाय कधि कधि माणसांना पर्याय नसतो.
दिनांक 20 मे 2017 या दिवशी सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास आम्ही गुरदुंग या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. आजची वाट देखिल काल प्रमाणेच दाट आरण्यांतून जाणारी फुलांनी बहरलेली पायवाट होती. वाटेत उगवलेली करवंदाच्या आकाराच्या आंबटगोड स्ट्रॉबेरीजचा आनंद घेत आम्ही उतरत होतो. काही अंतरावरच कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आमच्या काणावर येऊ लागला. उत्सुकता वाढली तसे आम्ही भराभर उतरु लागलो आणि एका वळणावर पहातो तर काय शुभ्र दुधासारखा फेसाळलेला धबधबा. आम्ही आता एका दरीतून जात होतो आणि त्याच दरीतून वाहणार्‍या लहानशा नदीवर पाई चालणाऱ्यांसाठी एक पुल उभारण्यात आला होता हव तर दुधसागरची लहान प्रतीक्रूती म्हणा. त्या पुलावरून आम्ही भरपूर फोटो घेतलेत. खरतर पाणी पाहील की पोहता येणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला पाणीच सुटत. धबधबा पाहूनतर पाण्यात उतरण्याची फारच इच्छा होत होती परंतु मागुन येणारा गाईड राजन सारखे पुढे दामटत होता. अखेर नाईलाजाने आम्ही चालते झालोत. तिव्र उतार संपुन आता आमची वाट ही त्या सुंदरशा नदीच्या सोबतीला चालू लागली. गुरदुंग सोडून एका तासाने आम्हाला वाहण चालेल असा पंक्का रस्ता लागला. गुरदुंग या गावाला जाण्यासाठी आम्ही आलो तोच एकमात्र रस्ता होता आणि वरपर्यंत कुठलही वाहण जात नव्हते. दुर्गम भागातील ते नितांत सुंदर ठिकाण वर पहाडात दिसेनासे झाले होते.
आता आम्ही चालत होतो त्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर होते. जेसीबी आणि क्रशरचा आवाज शांतता भंग करित होता. जंगल तोडून तिथे रस्ता बनविला जात होता. पुन्हा एकदा आम्ही आधुनिक जगात येउन पोहचलो. जंगलतोड करून चाललेल बांधकाम पाहून मला अतिशय वाईट वाटले कदाचित येत्या काही वर्षांत आम्ही आलोत त्या पायवाटेची जागा हा रस्ता घेईल आणि माणसांच्या, वाहनांच्या वर्दळीपासुन अलिप्त या जंगलाची शांतता लोप पावेल. निसर्ग संपवून विकासाचा चाललेला हा अट्टाहास क्लेशदायक आहे. विकास हा इथला फक्त निसर्गच नव्हे तर इथल्या माणसांची निरागसता, संस्कृती आणि माणूसपण सार काही हिरावून घेईल. कदाचित भविष्यात येथील जंगल, पशू, पक्षी, माणस आणि त्या माणसांची संस्कृती दर्शवनार एक संग्रहालय तयार होईल आणि तेथे आपण तिकीट काढून पॉपकॉर्न खात या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करू. रस्त्याने जाताना जसे आम्ही पुढे जाऊ लागलो तस जंगल संपुण चहाचे मळे दिसु लागलेत आणि घर देखील दिसू लागलित. पुढे एका ठिकाणी दोन लहान नद्यांचा संगम होता. तिथेच पुलाचे कामदेखिल चालले होते. आम्ही एक नदी ओलांडून पलीकडे गेलोत आणि थोडे वर चढलोत. वर नदीला लागूनच काही लाकडी बांधकाम केलेली हॉटेल्स होती. सकाळचे 11.00 वाजले होते आणि आम्ही श्रिखोला या ठिकाणी येऊन पोहचलो होतो. तिथेच एका हॉटेलच्या अंगणात आम्ही पडाव टाकला नदीच्या काठावर मांडून ठेवलेल्या लाकडी खुर्च्यांवर बसलोत आणि कॉफी घेतली. अवखळत वाहणार्‍या त्या नदीच्या किनारी घेतलेल्या कॉफीचा आनंद काय वर्णावा. काही वेळाने पुन्हा प्रवास सुरू झाला. थोडेच अंतर कापल्यावर त्या नदीवर एक पुल लागला. लाकडी पाट्या टाकून बनवीलेला झुलता असा तो पुल होता. हिमालयातल्या त्या जगली नद्यांवर असेच पुल बांधले जातात. पहाडात थोडा जरी पाऊस झाला तरी नदी रूद्र रुप धारण करते म्हणून ही उपाययोजना. त्या सुंदरशा पुलावर बराचवेळ फोटोसेशन करून आम्ही पुन्हा वाट धरली. दोन पहाडांच्या मधुन वाहणार्‍या नदीला समांतर असा तो वळणावळणाचा रस्ता होता. Royal Enfield गाडी बनली आहे ती खास अशा रस्त्यांसाठी, नाहीतर आपले मर्द मावळे शहरातील ट्रॅफिकने वाहणार्‍या रस्त्यावंर क्लच आणि ब्रेक ओढत तिला हाकत असतात.(केवढा हा करंटेपणा?... असो).
आता रस्त्याच्या बाजुने घरांची गर्दी वाढू लागली होती. नदीच्या बाजुने झोपडीच्या आकाराची टुमदार लाकडी घर उभारली होती आणि प्रत्येक घराच्या बाहेर कुंड्यानमध्ये विविध रंगाची फुले बहरलेली होती. लालबुंद रंगाची, गोबर्‍या गालांची ही पहाडातली माणस फुलांची फारच शैकिण असतात. हिमालयातील हे थंड अल्हाददायक वातावरण हे माणसांनप्रमानेच फुलांच्या वाढीसाठी देखिल अनुकूल आहे. मे महिन्यात महाराष्ट्रातील बर्‍याच शहरात जेव्हा पारा 40 अंशाच्या च्या पुढे असतो तेव्हा आम्ही इथे हिरवळिचा आणि गुलाबी थंडीचा आनंद घेत होतो. मी चेष्टेच्या सुरात राजनला म्हटंलो 'कभि मई मे आणा हमारे यहा महाराष्ट्रमे. 40 डिग्री मे बोहत मजा आता है. हे ऐकून तो हसतच म्हणाला ' अरे इतनी गर्मि मे तो हम मर जायेगा '. खरोखर हिमालयातील शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणातून ही माणस रोजगारासाठी आपल्या कडिल प्रदुषण, गोंगाट , उष्णता आणि गर्दीने भरलेल्या शहरात कशी रहात असतिल. त्यात भर म्हणून आपल्यातले काही महाभाग त्यांना त्यांना चिनी म्हणून, ऊ शाबजी म्हणून चिडवतात. इथल्या लोकांच आरोग्य, शारिरीक क्षमता, संस्कृती, सामाजिक जाणीवा, देशप्रेमाची भावना सार काही आपल्या कडील शहरी so cold, self centered, selfish लोकांच्या मानाने उत्तम आहे. मग भारतीय असल्याचा अभिमान नेमका बाळगावा तो कुणी?
चालत चालत दुपारचे तिन वाजलेत तरी देखील रस्ता काही संपण्याचे नाव घेईना. आज आमच्या ट्रेकचा पाचवा दिवस होता आणि दररोज आम्ही दहा ते बारा किलोमीटर अंतर कापत होतो. कितीही कणखर असलित तरी सगळ्याचीच शरिर आता उत्तर द्यायला लागली होती. सततच्या चालण्याने कुणाच्या पायात फोड आले होते, कुणाला जखमा झाल्या होत्या तर कुणाचा पाय लचकला होता आणि यामुळे बरेच लोक लंगडत चालत होते. सह्याद्रीतले ट्रेक हे एक, दोन किंवा तीन दिवसांत संपतात इथे आमचा पाचवा दिवस चालला होता. मला खर कौतुक वाटल ते आमच्यातल्या काही जेष्ठ मंडळीच. या वयातली इतर मंडळी जेव्हा घरी पाय पसरून 'शि काय उकडतय' IPL पहात होती. तेव्हा आमच्यातले हे काही पंन्नशिच्या आसपासचे तरुण आम्हाला लाजवेल अशा उत्साहात ट्रेक करीत होते. यात महिलांची संख्या अधिक होती हे विशेष. या वयात हा शारीरिक आणि मानसिक थकवा बर्याचदा असह्य होतो. नंतर घरी पोहचल्यावर आम्हाला कळले की आम्ही प्रत्येकाने त्या पाच दिवसात अंदाजे तिन ते पाच किलो वजन कमी केले होते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेकिगसारखा दुसरा पर्याय नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.
वाटेने चालतांना लहान लहान गोरीगोमटी मुल शाळेतून परततांना दिसत होती. आजचा रस्ता बराच रूंद होता तेव्हा आम्ही आठ दहा ट्रेकर्स मस्करी करत, फोटो घेत आणि पुढच्या ट्रेकचे मनसुबे रचत सर्वात शेवटी चालत होतो. दुपारी 3.30 च्या सुमारास आम्ही अखेर रिम्बीक येथे येऊन पोहचलो. रिम्बीक हे त्या पहाडातल बाजारपेठेच गाव होत. आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करताच ट्रेकचे व्यवस्थापक श्रिमणी सरांनी आमच हसतमुखाने स्वागत केले. ट्रेक आम्ही एकदाचा यशस्वीपणे पुर्ण केला होता. हा ट्रेक पुर्ण झाल्याचा एकाच वेळी आनंद आणि दुःख दोघही वाटत होते. अंघोळीला गरम पाणी मिळत आहे हे ऐकून आम्ही पळतच सुटलो. पटकन खोलीत सामान टाकला आणि अंघोळीला गेलो. तब्बल पाच दिवसांनी गरम पाण्याने मी अंघोळ करत होतो. तेंव्हा अंघोळीसारख्या रोजच्या क्रियेतही किती आनंद असतो याची प्रचिती आली.
रात्री जेवणापुर्वी CAMP FIRE च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व लोक एका शेकोटीच्या भवती जमून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करित असतात. बाहेर पाऊस असल्याने आमचा CAMP FIRE एका हॉलमध्ये विदाउट FIRE च चालू झाला. अवघि विस मिनिटे अवधी असलेला तो कार्यक्रम आम्ही एक दिड तास खेचत नेला. आमच्या ग्रुपमधील काही तरुण मुलांना गाण म्हटलं म्हणजे हनि सींग आणि अरजित सिंगच्या पलिकडे ही काही असत हे माहीत नव्हते तर काही जेष्ठाना हनि सिंग नाव जरी ऐकले तरी प्रचंड मानसिक त्रास व्हायचा. तेव्हा दोन पिढ्यातल या द्वंद्वावर मी एक कल्पना सुचवली. दोन समुहांनी समारोपाची दोन वेगळी गित गावित असे ठरले. सर्व तरुण मुला मुलिंनी 'अच्छा चलताहू दुवाओमे याद रखना' हे गित गायल तर जेष्ठानी 'कभि अलविदा ना केहना '. ती आमच्या ट्रेकची अखेरची रात्र होती आणि वातावरण खरोखर भाऊक झाले होते. तेव्हा मैफील थोडी हलकी करावी म्हणून सुजीतने जोरजोरात तुम तो ठेहरे परदेसी गायल त्यात माझ्यासकट सर्वानिच सुर मिसळला आणि हसत खेळत मैफिलीचा अंत झाला. रात्रिच जेवण अप्रतिम होत. गंप्पा मारत, हसत आम्ही जेवण आटोपलीत आणि बाहेर निवांतपणे बसलोत आमचा ट्रेक खरोखर संपला होता आणि एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती. मागच्या एक महिन्यापासून मला ज्या ट्रेक शिवाय काहीही सुचत नव्हतं तो ट्रेक अखेर संपला होता. उद्या गाडीने दार्जिलिंगला पोहचून परवा सकाळीच आम्ही घराकडे निघणार होतो.
रात्री बिछान्यात मी कॅमेर्‍यातील फोटो पहात पडलो होतो. प्रत्येक फोटो सोबत कितीतरी माणसे, ठिकाण, घटना यांच्या आठवणी बंदिस्त झाल्या होत्या. माझ्या मनात विचार आला प्रवास ही खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी नविन माणस, नविन ठिकाण, नवा निसर्ग अनुभवन याहूनही सुंदर काही असत का. त्यातच ट्रेकिग विषयीतर काय बोलावे. पहाड, नद्या, जंगल, माळराण यातुन पाई चालतांना मिळणाऱ्या आनंदाची सर अजुन कुठल्याही प्रकारच्या पर्यटनातून मिळने केवळ अशक्य आहे. ट्रेकिगमध्ये आपण निसर्गाशी खर्या अर्थाने तादात्म्य पावतो, एकरुप होतो. ट्रेकमध्ये पडणारे श्रम हे देखील आनंददायीच असतात. प्रचंड परिश्रमानंतर शिखर सर करण्याची ती भावना तर अवर्णनीय आहे. प्रसंगी मरणाचे भयदेखिल शिखर सर करण्याचे हे आकर्षण थोपवू शकत नाही. ट्रेकिगबंद्दल अस म्हणतात की *It is not mountains we conquer but ourselves.*
पहाडांची ती विशालता आपल्याला नम्र बनविते, ट्रेक मधले परीश्रम कणखर, सहनशील बनवितात आणि तो निसर्ग उत्कटता देतो. जगाला दाखविण्यासाठी नव्हे तर जग अजुन स्वच्छपणे बघण्यासाठी ट्रेक करायला हवेत. माझा असा अनुभव आहे की प्रत्येक ट्रेक नंतर ट्रेकिंगची ती झिंग अजुन अजून चढतच जाते, हे वेड आपल्या मनाचा ताबा घेते. वैयक्तिक पातळीवर बोलायच झाले तर ट्रेकिग हे मी स्वतासाठी निवडलेले व्यसन आहे.
रोजच्या जगण्याचा कटकटी, चिंता, समंस्या कुणाला नाहीत. या सार्‍यातून येणारी मरगळ असल्या पर्यटनातून नाहीशी होत असते. परंतु त्यासाठी Tourist बनून
नव्हे तर Traveler बनुन पर्यटन करायला हवे. जगण्यातला कटकटी या रोजच्याच असतात परंतु आठवणी बनविन्याची संधी आपल्यालाच निर्माण करावी लागते. प्रवास हा सुरवातीला आपल्याला निशब्द करतो आणि नंतर याच भावना शब्दरूप होऊन कागदावर पाझरू लागतात. प्रवासवर्णन हि ठरवून किंवा आठवून लिहावी लागत नाही तर हे लिखाण काळजात बंद आठवणिना वाट मोकळी करून देण असत, म्हणून ते वाचनार्यालाही आनंद देत आणि लिहीनार्यालाही. हिमालयातील संदकफू हे ठिकाण जस मला उमगल तस मी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही लेखातून, फोटोतून, व्हिडिओतून त्याची पुर्णपणे अनुभुती मिळणे अशक्य आहे. म्हणून मी म्हणेन 'Don't listen what I say, just go & see'.
या आधीच्या प्रवास वर्णनांनप्रमाने संदकफू डायरी मी स्वतासाठीच लिहिली होती. सहजच Facebook, What's app वर टाकली आणि येणार्‍या प्रतिक्रियांमधून चक्रावून गेलो. कितीतरी ओळखिच्या तसेच अनोळखी व्यक्तींनी लिखाण आवडले असे कळविले आणि पुढिल भाग लवकर टाकण्याचि विनंती केली. खरतर मी अतिशय आळशी प्राणी आहे परंतु या लिखाणाची आपण वाट पहात आहात याच गोष्टीने आणि आपल्या अभिप्रायानी मला लिहीते केले आणि केवळ दोन भागात संपविण्याचा हेतूने सुरू केलेली लेखमाला सहा भागापर्यंत ओढता आली. आपणासर्वोचा मी खरोखर आभारी आहे. परंतु मला हे प्रामाणिकपणे वाटते की लिखाणाला मिळालेली ही पावती लिखिणापेक्षा आपल्या सर्वाच्या मनातील पर्यटनासाठी च्या आकर्षणाची आहे. शेवटी आपल्या सर्वांच्या आत एक जिप्सी दडलेला असतोच. ज्याला सतत प्रवास करावासा वाटतो, नव काही अनुभवावस वाटत आणि हे अस वाटन हेच जिवंतपणाच लक्षण आहे कारण अस म्हणतात...
*TO TRAVELL IS TO LIVE...*
आपलाच ट्रेकर
*विनय पाटिल*

No comments:

Post a Comment

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...