Sunday, 11 March 2018

*माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग पाच

चवथा दिवस :
'अबके हम बिछडे तो शायद कभि ख्वाबोमे मिले
जिसतरह सुखे हुए फुल किताबो मे मिले,
गम-ए-दुनीया भी गम-ए-यार मे शामील करलो
नशा बढता है जो शराबे शराबो मे मिले. '
आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहप्रसंगाची जी अगतिकता' अहमद फराज' या महान शायराने वरिल शेरात व्यक्त केली आहे अगदी त्याच अगतिकतेने आम्ही संदकफू हे ठिकाण दिनांक 19 मे 2017 या दिवशी सकाळी 8.30 वाजता सोडले. एव्हरेस्ट, काचंनजंगा, माकालू, लोहत्से, पंडिम अशी हिमालयातील उंत्तूग शिखरे याची देही याची डोळा आम्ही आज सकाळी सकाळीच येथुन पाहीली होती. स्वप्नपूर्तीच्या भावनेनेच आम्ही आमचा आजच्या प्रवासाला सुरुवात केली. आजची आमची वाट ही घनदाट आरंण्यातून जाणारी अरुंद उताराची पायवाट होती. कुठल्याही ट्रेकमध्ये अपघाताचा आणि दुखापतिचा सर्वात अधिक धोका हा उतरतांना असतो. एव्हरेस्ट मोहिमेतील गिर्यारोहकांचे सर्वात जास्त म्रूत्यू हे उतरतांना झाले आहेत यावरून वरील विधानाचे मर्म लक्षात यावे.
उतरणीचा रस्ता पाहून सुरवातीला आमचा वेग बराच होता. पायवाटेने तो पहाड उतरतांना आम्हाला वेगळाच उत्साह जाणवत होता. सुरवातीला उंचच उंच पसरलेल्या व्रुक्षांची जागा आता डोक्याएवढ्या बांबूच्या वनाने घेतली. मधेमधे रान मोकळ होउन चहोदुर पसरलेल्या हिमालयातील रांगा दर्शन देत होत्या. मध्येच रानफुलांनी बहरलेल एखाद सुंदर झाड नजरेस पडत होत. झाडांच्या पानावर दवबिंदू साचले होते आणि संपुर्ण रानातुनच ओलावा पाझरत होता.
ट्रेक करतांना प्रत्येकाचा आपला एक वेग असतो आणि प्रत्येकाने आपल्याच वेगाने चढायला आणि उतरायला हव. सुरक्षेच्या कारणाने सक्तीने सर्वाच्या सोबत समुहाने चालण्यात आपण ट्रेकचा आनंद घालवतो अस माझ प्रामाणिक मत आहे. साधारणपणे तासाभरात सर्व ट्रेकर्स मध्ये बरच अंतर पडल. आमच्यातली काही मंडळी बरिच पुढे गेली होती. मी त्यांच्या मागोमाग थोड्या कमी वेगाने उतरत होतो. 2012 साली मी आणि सुजीतने भर पावसात कळसूबाईचा ट्रेक केला होता. ज्यात उतरतांना पावसामुळे आमच्या पायवाटेचा अक्षरशः ओढा झाला होता. त्या अतिशय घसरड्या पायवाटेवर मी पाठीवर जड बॅग असताना नऊ ते दहा वेळेला पडलो होतो आणि काही ठिकाणी तर चंक्क घसरगुंडी प्रमाणे घसरत खाली आलो होतो. पडतझडत कसेतरी आम्ही खाली पोहचलो होतो आणि या सर्वात माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. ही दुखापत एवढि वेदनादायी होती की भविष्यात आपण कधि कुठला ट्रेक करणार की नाही असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. या अनुभवातून ट्रेक करतांना knee cap वापरण्याच आणि सावकाश उतरण्याच शहाणपण मला आल.
आतापर्यंत माझ मागच्या आणी पुढच्या मंडळीपासुन बरच अंतर पडल होत. बर्याच वेळापासुन मी एकटाच चालत होतो. या अशा वाटेवर एकट चालतांना मला जर कुठल्या प्राण्यांपासून खरोखर धोका होता तर ते म्हणजे अस्वल. अस्वल हा अतिशय आक्रमक प्रणि असतो तो एकट्या दुकट्या व्यक्तीवर हंल्ला करतांना कचरत नाही हे मला माहीत होतं. मी सुरक्षेसाठी वाटेतच वाळलेल्या एका बांबूची काठी हातात घेतली. माझ्या डोक्यात विचार आला जर खरोखरच झाडीतून अचानक अस्वल समोर आल आणि त्याला जर का बोलता आल तर माझ्या हातातली काठी पाहुन ते हसुन म्हटल असत "अस्वल के तापसे तुम्हे कोई बचा सकता है तो एकही चिज खुद अस्वल हा हा हा".परंतु तरीही उगाच स्वताच्या खोट्या समाधानासाठी मी ती काठी घेऊन चालू लागलो.
पुढे काही अंतरावर थोडा मोकळा परिसर लागला. गुडघ्या एवढ्या गवतात पुढे गेलेली मंडळी आरामाने पडली होती. त्यांना पाहुन बर वाटल. इथे आम्हाला मागुन येणार्‍याची वाट पाहत थांबायचे होते. पाणी पिऊन आणि उशाला बॅग घेऊन मि देखील आडवा झालो. परंतु काही क्षणातच गवतातील किड्यांनी कपड्यात, काणात घुसून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्यामुळे पुन्हा उठून बासावे लागले. 20 मिनिटे झालीत तरीही कुणी येण्याची चिन्हे दिसत नव्हती. आम्ही खान्याच्या वस्तू बाहेर काढल्यात आणि किड्यांमधुन मिळनारा प्रोटिन्सयुक्त आहार टाळत नाश्ता संपवला. अर्ध्या तासाने काही ट्रेकर्स आम्हाला येउन मिळालेत त्यानंतर एक दोन करत पाउन तासात सर्व मंडळी त्या मोकळ्या जागी जमली. मागुन येणाऱ्या काही ट्रेकर्सनी आपल्या पिलासह बसलेले अस्वल पाहिल्याचे सांगितले. म्हणजे मी मघाशी केलेल्या गोष्टी केवळ कल्पनारंजन नव्हत्या मी स्वताशिच म्हणालो आणि चालू लागलो.
मागच्या अडीच तिन तासांपासून आम्ही उतरत होतो आणि उतरतांना बुटात पुढे दाबली जाणारी पायाची बोट आणि पोटर्या आता दुखायला लागल्या होत्या. चरबीचे थरावर थर असलेल्या मंडळींना अधिक समंस्या जाणवत होत्या. आतापर्यंत आम्ही सहा किलोमीटर अंतर कापले होते अजून इतकेच अंतर आम्हाला कापायचे होते. वाटेतल्या रानफुलांचे आणि निरनिराळ्या वनस्पतीचे फोटो घेत आम्ही उतरू लागलो. माझ्या डाव्या गुडघ्याच जुने दुखणे हळूहळू डोके वर काढू लागले तसा मी वेग अजूनच कमी केला. इथे पायाला काही दुखापत झाली असती तर झोळीत टाकून इतरांच्या खाद्यावरूनच त्या व्यक्तीला खाली नेता येणे शक्य होते एवढ्या आडवाटेने आमचा प्रवास चालला होता. विकासापासून तो प्रदेश अस्पर्शीत होता आणि म्हणूनच एवढा सुंदर होता.
दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास उतारावर काही लाकडी घर दिसु लागलीत ते दुष्य पाहून जिवात जिव आला. वाटेत एका भल्या मोठ्या शिळेला लागुन एक लाकडी बाक दिसला तिथेच मी आणि सुजीतने बॅग टेकवल्यात आणि विश्रांतीसाठी बसलोत. काही वेळाने आमच्या मागून एक तरुण जोडप आणि त्यांच्यासोबत उतरणारा एक स्थानिक गाईड दिसला. तेही आमच्या समोरच्या दगडावर येउन बसलेत. नेहमीप्रमाणे मी चौकशी केली तेव्हा कळले की सलमान चैधरी नाव असलेला तो युवक व्यवसायाने डॉक्टर होता आणि फराह हि त्याची मैत्रीण एग्रिकल्चर इंजिनिअर होती. हे दोन्ही मुळचे असामचे रहिवासी होते आणि फक्त दोघेच त्या गाइडच्या सोबतीने हिमालयातील दर्याखोर्यातून भटकंती करत होते. मागच्या चार दिवसाच्या प्रवासात फक्त हे दोघेच आम्हाला पाइ चालतांना वाटेत भेटलेत यावरून त्या निर्मनुष्य भागाची कल्पना यावी. मला त्या जोडीचे फार कौतुक वाटले. गर्दीने भरून वाहणारी भारतातली इतर पर्यटन स्थळ सोडुन हे लोक असुविधानी भरलेल्या हिमालयातून भटकत होते. नक्कीच इतरांच्या तुलनेत जागाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता.
मला प्रवासात भेटणारी अशी निरनिराळी माणस आणि विशेष म्हणजे त्या माणसांचे जगाकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टीकोन फारच आकर्षित करतात. पर्यटनात आपण खरे श्रीमंत होतो ते इथे. अस माणस वाचुन श्रीमंत होण्यासाठी आपले परकेपणाचे, शिष्टाचाराचे चष्मे काढुन ठेवावे लागतात आणि मोकळ व्हाव लागत. जे AC च्या प्रवासातून, लक्झरीयस हॉटेलात राहुन आणी महागड्या टुर पॅकेजेस मधुन शंक्य होत नसत. प्रवासातला साधेपणा आणि असुविधा अस मोकळ होन सोप बनविते. आपण नाही का एसटी च्या प्रवासात ती सुरळीत चालत असते तो पर्यंत आपल्याच मोबाईल मध्ये मग्न असतो. शेजारच्या सहप्रवाशाशी चुकुन देखिल बोलत नाही. परंतु तिच एसटी पंचर होऊन थांबते तेव्हा महामंडळाला शिव्या देण्याच्या मुद्द्यांवरून का असेना एकदुसर्याशी बोलते होतो. माझा असा अनुभव आहे की प्रवासातल्या या असुविधाच त्या प्रवासातल्या गोड आठवणींचा ठेवा मागे ठेउन जातात. अस म्हणतात की *' You can always make money, but you can't always make memories '*.
दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आम्ही गुरदुंग या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलोत. गुरदुंग हे पहाडाच्या उतारावर ठराविक अंतरावर वसलेल्या लाकडी घरांचे गाव आहे. दुरवर पसरलेल्या हिमालयातील पहाडांच्या रांगा, उतारावरील टुमदार लाकडी घर, घरांच्या भवती परसात फुललेली विविधरंगी फुलं,बाजुलाच पहाडातुन आवाज करत वाहणारी नदी, वाटेने उगवलेली करवंदाच्या आकाराची आंबट गोड लालबुंद स्टॉबेरी, हवेतून वाहणारा गुलाबी गारवा, माझ्या उभ्या अयुष्यात मी पहाडातल एवढ सुंदर ठिकाण पाहिल नव्हत. आमच्या ट्रेकच्या प्रत्येक ठिकाणाच वैशिष्ट्य वेगळ होत. टम्बलिंगच घर सुंदर होत, कालीपोखरीचा सुर्यास्त सुंदर होता, संदकफू येथुन दिसणारी शिखर सुंदर होती परंतु गुरदुंगच निसर्ग सैदर्य अवर्णनीय होत. पाहताक्षणी प्रेमात पडाव एवढ सुंदर हे ठिकाण होत.
चार बाजूला बांधलेली लाकडी घर आणि मधोमध हीरव मोकळ अंगण अशा सुबक रचनेचे आमचे आजचे हॉटेल होते. दुपारी जेवण करुन आम्ही थोडा आराम केला आणि संध्याकाळ मजेत शेरोशायरी आणि गझलेच्या मैफीलत घालविली. चोहीकडे जेवढा सुंदर निसर्ग होता तेवढिच आमच्या समूहात काही दर्दी माणसे देखिल होती. मराठी माणूस म्हणजे 'गाणे आणि खाणे' या दोन गोष्टीवर आमच्या प्रमाणेच प्रेम करणारी माणसे या ट्रेकमध्ये आम्हाला लाभलीत. ज्यात धुळेकर डॉ. संजय चित्ते होते तसेच त्यांच्या पत्नी आणि अनेक कलात निपुण सौ. रुपाली चित्ते होत्या. डॉक्टर चित्तेंची कंन्या आर्किटेक्ट आणि उत्कृष्ट फोटोग्राफर सृष्टी होती. औरंगाबादचे व्यवसायाने शिक्षक असलेले पवार दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा संकेत होता. नाशिकच्या नावाजलेल्या चित्रकार सौ. अर्पणा चौगुले होत्या, मंगल सोनवणे होत्या , धुळेकर डॉ. सौ. मनिषा भावसार होत्या आपल्या दोनही मुलांसोबत आलेल्या सौ. प्रेरणा बोरसे होत्या, शांत आणि हसमुख कॉलेजकुमार दर्शन होता, अवघ्या 13 वर्षे वयाचा परंतु प्रचंड कणखर असा अभिषेक होता, हुशार आणि कुतूहलाने भरलेला रोहण होता, अतिशय समजदार आणि सालस अशि सई होती, सेल्फिक्विन साक्षी होती, जय- विरू असे रोहण आणि ऋतूज होते सदैव मदतीस तत्पर असा कौस्तुभ होता, हॅपी गो लकी राज होता, आणि सोबत माझ्या प्रत्येक ट्रेकचा पार्टनर सुजित होता. असा आमचा बराच मोठा समविचारी लोकांचा गोतावळा जमला होता.
रात्री जेवणानंतर आम्ही काही तरूण मंडळी बाहेर पाउस चालू असतांना एका झोपडीत शेकोटिची उब घेत बसलो होतो. आजचा प्रवास सुंदर होता परंतु उद्या आमच्या ट्रेकचा अखेरचा दिवस होता. मागच्या चार दिवसांपासून मोबाईलला रेंज नसल्याने जगाशी जवळपास आमचा संपर्क तुटला होता. या ट्रेकमध्ये सहभागी झालेली मंडळिच मागच्या काही दिवसांपासून आमच विश्व होत्या. आमच्यात असलेल्या सर्व औपचारिकता आता गळुन पडल्या होत्या सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. उद्या हे सर्व संपणार होत. बरिच रात्र झाली तरी कुणाचाही पाय निघत नव्हता. आपापल्या अयुष्यातल्या समस्या, चिंता, कटकटी विसरून सारे इथे जमले होते आणि रंगात आलेली ही मैफिल कुणालाही सोडवत नव्हती. त्या रात्री मला उगाच गुलजार यांच्या या ओळी सारख्या सारख्या आठवत राहिल्या ...
दिल ढुढता है फिर वही फुरसत के रात दिन,
बैठे रहे तसंब्बुरे, जाना किये हुऐ...
*To be continued...*

1 comment:

  1. Good written ... Great memories with you...
    Good going ...Keep it up dear...

    ReplyDelete

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...