Sunday, 15 April 2018

कविता बिवीता.. असिफा

मला माफ करा परंतु क्रुपया कुणी
त्या आठ वर्षे वयाच्या मुलीचा उल्लेख करूच नका...

क्रुपया कुणी ही आपला डि पी काळा ठेऊ नका किंवा त्या रेपच्या घटनेची पोस्ट पूढे पाठवू नका

काय आहे आपण अस करुन आपला सात्विक संताप व्यक्त करतात हे खरय परंतु तुमच अस करण्याने मला सारखी सारखी ती चिमुरडी आठवत रहाते

माझा पिछाच सोडत नाहीये ती चालतांना, वाचतांना, बोलतांना, विचार करतांना ...

तीच्या डोळ्यात सारखी मला माझीच मुलगी, बहीण, आई दिसत असते जी विचारत असते मला मानवी संभ्यता या शब्दाचा अर्थ

आणि जातीचा, धर्माचा, राष्टाचा अभिमान बाळगनारा मी तिला प्रचंड आपराधी पणाच्या भावनेने सांगतो


आज मला खरोखरच लाज वाटते आहे माझ्या माणूस असण्याची...

Friday, 30 March 2018

महायुद्धांच्या चित्रकृती भाग २: खिरस्तोफर नोलन आणि डंकर्क...

       इंग्रजि साहित्यात पदवी घेत असलेला एक ब्रिटिश विद्यार्थी १९९२ सालच्या सुट्यांमध्ये आपली मैत्रीण इम्मा थॉमस  आणि आणखी एका मित्रांसोबत इंग्लंडहुन फ्रान्सला  बोटेने निघाला होता. बोटेच्या डेकवरून जसे  त्यांना शहर दिसू लागले तसे त्याची मैत्रीण आनंदाने ओरडली 'डंकर्क'. कुठल्याही मराठी माणसाला रायगड असे म्हटल्यावर जे काही होते तसेच काहीतरी नातं ब्रिटिशांचे  डंकर्क या ठिकाणाशी आहे. मुळात फ्रान्सच्या किनाऱ्यावरील हे एक शहर ब्रिटिशांची अस्मिता, पराक्रम आणि लढाऊवृत्ती यांचे कारण कसे ठरू शकते याची पाळेमुळे दुसऱ्या महायुद्धात आहेत.अस्मिता,राष्टप्रेम आणि गौरवशाली इतिहास या साऱ्यांच्या व्यतिरिक्त त्या  तरुणाच्या मनात त्या क्षणी अजून काहीतरी आले. कल्पकता ,प्रयोगशीलता आणि महत्वाकांक्षा यांचा मिलाफ असलेला तो तरुण येणार्र्या शतकातला एक  महत्वाचा चित्रपट दिग्दर्शक होता.ज्याला फ्रान्सच्या किनाऱ्यावरील '
डंकर्क' हे शहर बघून त्या दिवशी  एका चित्रपटाची कल्पना सुचली होती. २०१८ सालच्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवणारा तो चित्रपट म्हेणजे डंकर्क आणि त्या बोटेवरचा तो प्रतिभावान तरुण म्हणजे जागतिक सिनेमात प्रयोगशीलतेसाठी ओळखला जाणार दिग्दर्शक 'खिरस्तोफर नोलन'.
        हॉलिवूडच्या सिनेमात रस असणाऱ्यांना ख्रिस्तोफर नोलन हे नाव तसे नवे नाही. मोमेंटो ( ज्यावर अमीर खानचा गजनी बेताल होता) द प्रेस्टिज, इनसेप्शन, द डार्क नाईट, इंटरस्टेलर असे अनेक कल्पकता ,प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतले  मैलाचे दगड ठरलेल्या चित्रपटांचा तो कर्ता आहे.  त्याची ओळख सांगण्यासाठी एवढे पुरेसे आहे. नोलनच्या चित्रपटांची संपूर्ण जगात अतिशय आतुरतेने वाट पहिली जाते फक्त सिनेरसिकच नव्हे  तर अनेक समीक्षक देखील त्याच्या चित्रपटाचे चाहते आहेत परंतु ऐतिहासिक घटनेवर चित्रपट बनविण्याचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता.
         १९३९ ते १९४५ दरम्यान लढल्या गेलेल्या दुसऱ्या महायुद्धातल्या २६ जुन ते ४ मे १९४० दरम्यान घडलेल्या एका प्रसंगावर हा सिनेमा बेतलेला आहे. नाझी सैन्याच्या जोरदार मुसंडी पुढे टिकू न शकलेल्या दोस्त राष्ट्राच्या फौजा डंकर्क या फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका शहरात एकवटलेल्या आहेत. दोस्त राष्ट्रांच्या सुमारे चार लाख सैनिकांना नाझी फौजेने जमिनीच्या बाजूने घेरलेले आहे .नाझी सैन्याच्या हाती लागण्यापूर्वी समुद्रमार्गे या सैन्याला नागरी बोटांमधून इंग्लंडमध्ये नेण्याचा प्रसंगाला इतिहासात डंकर्कची यशस्वी माघार म्हणून संबोधले जाते. महायुद्धाच्या सुरवातीसच जर एवढे मोठे सैन्य हिटलरच्या हाती लागले असते तर कदाचित दुसऱ्यामहायुद्धाचा आणि जगाचा इतिहास हा वेगळा असता.म्हणूनच डंकर्कची यशस्वी माघार हि जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी मह्तवपूर्ण घटना म्हणून ओळखली जाते.   
       ख्रिस्तोफर  नोलेनचे चित्रपट हे एकाच प्रयत्नात काळतील असे मुळीच नसतात. त्याच्या चित्रपटाची कथा कधीही एका सरळ रेषेत प्रवास करीत नाही तर आढेवेढे घेत जाते आणि अधिक गुंतागुंतीची असते .शिवाय Timespace म्हेणजेच काळ आणि वेळ हि देखील त्याचा चित्रपटात एकाचवेगाने प्रवास करताना आढळून येत नाही. खासकरून वेळ ह्या चौथ्या मितीचा त्याचा चित्रपटातला वापर हि गोष्ट प्रेक्षकांना चक्रावून सोडते.खासकरून इनसेप्शन, इंटरस्टेलर आणि डंकर्क या चित्रपटातला त्याने वेळेचा केलेले वापर त्याचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. नोलन प्रेक्षकांना कधीच गृहीत धरत नाही आणि प्रेक्षकांना काहीही रेडिमेड देणे देखील टाळतो.डंकर्क हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल.
        हा चित्रपट एकाच वेळी  हेवेत ,पाण्यात आणि जमिनीवरील  तीन वेवेगळ्या घटनांना सोबत घेऊन चालतो .या तीनही घटनांचा एकदुसरीशी संबंध आहे परंतु त्या घटनांतील वेवेगळ्या वेळांमध्ये घडणारे प्रसंग नोलन प्रेक्षकांसमोर मांडतो आणि त्या सर्व प्रसंगांचा संबंध जोडून त्यांचा अर्थे समजावून घेण्याची जबाबदारी पुर्नपणे प्रेक्षकांची असते. प्रेक्षकांना बौद्धिक कसरत करायला लावणे हि नोलनच्या दिग्दर्शनाची खासियत आहे.याच कारणामुळे त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिल्यास वेगवेगळे संदर्भ स्पष्ट होत जातात.
          नोलनचा आणखी एक महत्वाचा दिगदर्शकीय पैलू म्हणजे त्याचा चित्रपटातील पात्रांना तो नेहमी काहीं कठीण पर्याय देऊन त्यातून एकाची निवड करण्यास भाग पाडीत असतो. त्याच्या बहुतेक चित्रपटाचा तोच लेखक किंवा सहलेखक असल्यामुळे चित्रपटात असे निर्णयाचे प्रसंग उभे करण हे त्याला आवडते हे स्पष्ट होत. डंकर्क या चित्रपटात रॉयल नेव्हीच्या  स्पिटफायटर विमानात फक्त एक तास पुरेल एवढंच इंधन शिल्लक असताना दोस्त राष्ट्रांच्या फौजांना जर्मन बॉम्बर्स विमानांकडून   चिरडले जाऊ द्यायचे कि परतीचे सर्व मार्ग बंद करून लढत राहायचे याचा निर्णय वैमानिक असलेल्या टॉम हार्डी याला घ्यायचा असतो तर आपल्या बोटीत मरणाच्या तोडांत असलेल्या मदतनीस म्हणून आलेल्या मुलाला वाचवण्यासाठी परत फिरावे कि पाण्यात बुडून मारणाऱ्या सैनिकांना वाचवण्यासाठी पुढे जावे याचा निर्णय नागरी बोटीचा मालक असेलेल्या मार्क राईलान्स याला घ्यायचा असतो. असेच प्रसंग त्याचा इतर चित्रपटातही दिसतात .अशा प्रसंगातून श्रेयस आणि प्रेयसाच्या निवडीतला संघर्ष उभा करण हे नोलनला आवडते.
              आपला चित्रपट वास्तवाच्या अधीक जवळ घेऊन जाण्यासाठी जागतिक सिनेमातील काही दिगदर्शक कमालीचे बांधील असतात .नोलन हा त्यातलाच एक आहे,म्हणून डंकर्क मध्ये कधी विमानांमधील युद्ध दाखविताना तो खर्या फायटर विमानात अभिनेत्याला बसवून आणि फ्रंट तसेच रेअर कॅमेरा लावून टनेल इफेक्ट मिळवतो तर कधी डंकर्कच्या मोहिमेत खरोखर सहभागी झालेल्या नागरी बोटींना मिळवून पुन्हा चित्रीकरणासाठी वापरतो .चित्रपटाच्या बारकाव्यातून आणि सूचक प्रतिमेतून परिणाम साध्य करण्याची विलक्षण हातोटी असेलेले असे काही दिगदशक आज आपल्याला जागतिक सिनेमात पाहायला मिळतात.
    या चित्रपटातले सवांद अतिशय नेमके आहेत आणि संवादाहूनही त्यात येणारे पॉज हे अधिक काही सांगत असतात. उदाहरण म्हणजे जेव्हा ब्रिटिश नागरी नौका डंकर्कच्या किनाऱ्यावर सैनिकांना घेण्यासाठी येताना नेव्ही कमांडर बाल्टन याला दुर्बिणीतून दिसतात तेव्हा तो आपल्या सहकारी फ्रेंच अधिकाऱ्याला म्हणतो " You can particularly see it from here   ....home "  . दुसऱ्या एका प्रसंगात इंग्लंडच्या किनाऱ्यावर सुखरूप परतलेल्या सैनिकांना एक अन्धवृद्ध व्यक्ती ब्लॅंकेट वाटत  वेल डन म्हणत असते. तेव्हा अॅलेक्स नावाचा सैनिक त्याला म्हणतो "  All we did is survive  "  हे ऐकून तो वृद्ध उद्गारतो " That's enough " . मुळात युद्धेशास्राच्या नियमाप्रमाणे डंकर्कची माघार हा ब्रिटिशांचा मोठा पराभव होता आणि १९४२ सालच्या सिंगापूरचा पडावापर्यंत तो खोरोखऱ पराभव समजला जात होता परंतु सर्वसामान्यांसाठी  एवढ्या सैनिकांचे वाचलेले प्राण हि घटना नैतिक विजयाची होती आणि याच नैतिक विजयाचा डंका वाजवून ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी सैन्याचं आणि नागरिकांचे मनोधिर्य कमालीचे उंचावले होते.जे दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांच्या विजयमागचे एक महत्वाचे करण होते.
            या संपूर्ण चित्रपटात कुठेही, जर्मन रणगाडे,नाझी सैनिक त्यांचा हिंसाचार इत्यादी दिसत नाही .शत्रूची अचानक येणारी बॉम्बर विमाने ती देखील लॉन्ग शार्टमध्ये आणि त्यांचं आवाज तसेच चित्रपटाला हॅन्स झिम्मर याचे पार्शवसंगीत आणि परतीच्या वाटेकडे अगतिकपणे पाहनारे सैनिक यांच्याच वापराने अपेक्षित परिणाम साधला जातो. सोबतीला असते ती अचंबित करणारी सिनेमॅटोग्राफी, जी  नोलानच्या चित्रपटांचा आत्मा असते. सिनेमॅटोग्राफी आणि प्रतिमांचा प्रभावी वापर करून नोलन आपल्याला थेट युद्धभूमीतच नेवून सोडतो, म्हणून शक्य असल्यास त्याचे चित्रपट हे सिनेमागृहातच पाहावेत.     
       काही जाणकारांच्या मते डंकर्क हा ख्रिस्तोफर नोलनचा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे .स्वतः नोलन म्हणतो कि या चित्रपटात मी खूप जास्त प्रोयोग केले आहेत. बहुतेक यामुळेच ९० व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये डंकर्कला सर्वोत्तम दिग्दर्शकासह  तब्ब्ल ८ नामांकने मिळाली होती ज्यात बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट फिल्म एडिटिंग आणि बेस्ट साऊंड मिक्सिग या  विभागात हा चित्रपट पुरस्कार पटकाविण्यात यशस्वी ठरला. २०१८ सालच्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारांची विशेष बाब म्हणजे डंकर्कच्या घटनेचे सूत्रधार तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या जीवनातील दुसऱ्या महायुद्धवर आधारित The darkest hour या चित्रपटातील अभिनयासाठी गॅरी ओल्डमॅन या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हि घटना आज ७३ वर्षांनंतरही जागतिक सिनेमावर असेलेला दुसऱ्या  महायुद्धाचा प्रभाव विशद करते.   
    चार्ल्स रॉबर्ट डार्विन या महान जीवशास्र्ज्ञाने सांगितले आहे कि काहीही करून आपले अस्तित्व टिकऊन ठेवणे आणि ते टिकविण्यासाठी उत्क्रांत होणे हि सजीवांच्या जगण्याची दोन महत्वाची प्रयोजने आहेत. म्हणूनच निसर्ग नियमाप्रमाणे प्राणी आणि मनुष्य जिवंत राहण्यासाठी शक्य ते सर्व करतात .फरक एवढाच असतो कि प्राण्यान्माधले हे survival शक्तीने किंवा युक्तीने होत असते तर माणसांमध्ये शक्ती ,युक्ती, राजकारण ,अर्थकारण, समाजकारण, आणि प्रसंगी स्वतःचे प्राण धोक्यात घालून इतरांना वाचवण्याइतपत टोकाची मानवी संवेदना या साऱ्यावर अवलंबून असते.जी प्रेक्षकांना या चित्रपटात रॉयल एअर फोर्स च्या वैमानिकात,अखेरच्या फ्रेंच सैनिकांसाठी डंकर्कवर थांबलेल्या नेव्हल  कमांडरमध्ये आणि आपल्या नागरी बोटी घेऊन युद्धात अडकलेल्या सैनिकांना न्यायला आलेल्या ब्रिटिश नागरिकांमध्ये पाहायला मिळते.
          एका प्रचंड मोठ्या मानवी समूहांची जिवंत राहण्यसाठीच्या संघर्षची गोष्ट सांगणारा आणि सोबतच युद्धाचे भयाण वास्तव मांडणारा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा  आवर्जून पाहावा असा चित्रपट  "डंकर्क..."   

विनय पाटिल... दिनांक 30 मार्च 2018

Thursday, 15 March 2018

सिनेमा बिनेमा ...Me Before You...जगन सुंदर आहे ,जगण्यातील वास्तवासकट...


हॉलिवूडच्या गाजलेल्या 'स्पार्टा' हा सिनेमा संपण्यापूर्वी अखेरच्या दृश्यात अजिंक्य अशा स्पार्टन साम्राज्यावर विजय मिळवलेला अखिलीस हा महान योद्धा अपोलो या स्पार्टन साम्राज्याच्या  अजेयतेची निशाणी असलेल्या ग्रीक देवतेच्या पुतळ्याचं मस्तक तलवारीने धडावेगळे करताना म्हणतो "देवतानाही मनुष्याचा हेवा वाटतो कारण मनुष्याला मरणाचं वरदान आहे ",
    अतिशय रोमहर्षक वाटणार हे वाक्य परंतु वास्तवात तेव्हडे खरे आहे काय .मरणाचं वरदान असेलेली हीच मानस जेव्हा त्यांच मरण समोर स्पष्ट दिसत असत तेव्हा मात्र सैरभैर होतात. आपला मृत्य अटळ आहे आपण सारेच जाणतो परंतु तो नक्की  केव्हा आणि कसा येणार हे  नजानेच आपले जगणे सुसहाय बनवत असत . मात्र काही व्यक्तींना आपला मृत्यू केव्हा आणि कसा यावा हे निवडण्याचं वरदान किंवा अभिशाप लाभतो ते ईच्छामरणाने .
     'मी बिफोर यु' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला सिनेमा अपघातात कायमच आणि वेदनादायक अपंगत्व आलेल्या 'सॅम फ्रँकलिन' या देखण्या ,श्रीमंत,साहसी,परंतु अपंगत्वामुळे जगण्याला कंटाळलेल्या नायकाची इच्छामरण स्वीकारण्याची कथा आहे. सॅम आपल्या मातापित्यांचा कारणाने आपले मरन काही दिवस लांबणीवर टाकतो . यादरम्यान सॅमची देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त झालेली 'एमिला क्लार्क'( जिला आपण गेम ऑफ थ्रॉन या गाजलेल्या सिरीज मध्ये पाहत आहात) या सुंदर ,चुणचुणीत,थोडीशी बावळट परंतु जगण्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या तरुणीची नियुक्ती होते. सॅम हा आपल्या पूर्वीच्या आयुष्यात साहसी गोष्टी करणारा,भरपूर पर्यटन करणारा ,यारोका यार असणारा तरुण अपघातातून आलेल्या अपंगत्वाने ,वेदेनने आणि असाह्यतेने सतत वैतागलेला  असतो .तर इमीला हि हसतमुख ,अव्यहारीक ,आणि पैशाच्या निकडीमुळे पडेल ते काम करणारी मुलगी त्याला काहीही करून आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात असते .पुर्नपणे भिन्न पाश्र्वभूमी  असलेल्या या दोघांचे जाण्यासंबंधीचे आणि जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन एकदुसऱ्याच्या सानिध्यात अधिक व्यापक होत जातात.या सर्वात एमिला समोर सर्वात मोठे आव्हान असते ते सॅमचा इच्छामरणासंबंधीचा विचार बदलणे परंतु इमीला काही केल्या तो विचार बदलू शकत नाही .याउलट तिलाच केवळ जगणेच नव्हे तर मृत्यू देखील परिपूर्ण आणि आनंददायक असू शकतो हा नवीन विचार लाभतो.
      सगळ्याच इच्छा त्यागल्यात कि मनुष्याला पूर्णत्व येऊ शकते हा अध्यत्मातला एक मान्यताप्राप्त विचार आहे परंतु तो जगण्यातल्या वास्तवाशी फारकत घेतल्यासारखा वाटतो .साऱ्याच इच्छा त्यागल्यात कि मग महत्वाकांक्षी  व्हावे ते कसे आणि उन्नत व्हावे ते कसे जे निसर्ग नियमाप्रमाणे सजिवांच्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे .असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात परंतु हा चित्रपट असा फारसा खोलातला विचार माडांन्या ऐवजी मृत्यू जर अटळ आहे तर आनंदाने  त्याचा स्वीकार करावा हेच तत्वज्ञान मांडताना दिसतो.
      या चित्रपटात इंग्लंड मधील शहर ,वास्तू,आणि निसर्ग या साऱ्याच सुंदर चित्रीकरण दिसत.चित्रपटाच्या प्रेत्येक फ्रेम मध्ये सौंदर्य भरून राहत आणि या सोबत साथ असते ती मधुर पार्श्व् संगीताची परंतु चित्रपटाची सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे इमीला क्लार्क या नितांत सुंदर हास्य असेलेल्या अभिनेत्रीचा सहज, सुंदर अभिनय . इमीलाच्या प्रत्येक कृतीतून,हास्यातुन,बोलण्यातून चैतन्य सळसळत असत . आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर या गुणे अभिनेत्रीने हा चित्रपट तोलून धरला आहे.
     आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग किंवा मानस येतात ज्यांच्या येण्याने आपल जगन आमूलाग्र बदलून जात.आयुष्यातल्या अशाच व्यक्तीला किंवा प्रसंगाला डोळ्यासमोर ठेवून पाहावा असा सिनेमा 

....Me Before You....

Sunday, 11 March 2018

कविता बिविता ....स्वर्ग




ह .भ. प कुणी मला म्हणाले कशास आपण जन्मा आले
दानधर्म ना पुण्य कर्म ना , असेच किती जन्म जाहले
जगता आपण ऐसे जैसे स्वर्ग आपल्या खिशात आहे
किंवा मजला सांगुनी टाका स्वर्ग आपला कशात आहे.

ऐकून त्यांची कुत्सित वाणी मीही झालो पाणी पाणी
विवेक सारा बाजूस ठेवून उत्कटतेने म्हणालो आणि ...

स्वर्ग उमदं राहण्यात आहे
स्वर्ग विसरून जाण्यात आहे
नजरानजर होताच कुठे
स्वर्ग लाजून पाहण्यात आहे

स्वर्ग कवीच्या ओठात आहे
स्वरगंगेच्या काठात आहे
गुलाब ,जाई फुलविणाऱ्या
माळावरल्या पाटात आहे

स्वर्ग नाकाच्या नथीत आहे
स्वर्ग समईच्या वातीत  आहे
कन घेऊन कणीस देत्या
स्वर्ग काळ्या मातीत आहे

स्वर्ग दोन देण्यात आहे
स्वर्ग दोन खाण्यात आहे
निर्ढावलेल्या मुजोरांना
छातीवरती घेण्यात आहे

स्वर्ग वरातीत नाचण्यात आहे
स्वर्ग मनमुराद हसण्यात आहे
तळीरामांच्या गप्पा ऐकत
चकणा खात बसण्यात आहे

स्वर्ग आमटीच्या झुरक्यात आहे
स्वर्ग भाकरी आणि झुणक्यात आहे
दोन खापात कांदा फोडणाऱ्या
तळहाताच्या दणक्यात आहे


स्वर्ग शनिवार वाड्यात आहे
शिवरायांच्या पोवाड्यात आहे
कुस्ती आणि लावणी वरच्या
महाराष्ट्राच्या वेडात आहे


स्वर्ग अप्सरा आलीत आहे
ओठावरल्या लालीत आहे
काळजाच्या ठाव घेत्या
मादक मोहक चालित आहे

स्वर्ग कधी प्रारब्धात आहे
गतकाळाच्या गद्यात आहे
जगण्यावरती प्रेम करत्या
पाडगावकरांच्या शब्दात आहे


स्वर्ग पुस्तकाच्या  गंधात आहे
वाचनाच्या बंधात आहे
वाचता वाचता लिहीत करंत्या
कवितेच्या छंदात आहे

स्वर्ग देत राहण्यात आहे
हृदयगीत गाण्यात आहे
मिळुनी साऱ्या रंगामध्ये
पाण्यासारखे वाहण्यात आहे

तुटण्यापूर्वी तगण्यात आहे
विझण्यापूर्वी धगन्यात आहे
स्वर्गाच्या इच्छेत मरण्याआधी
स्वर्ग बेधुंद जगण्यात आहे
 
   
       विनय पाटील
      १७/०१/२०१६

माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग सहा

पाचवा दिवस :
"उगवतिचे ऊन आता मावळतिला पोहचले आहे
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे,
तक्रार नाही खंत नाही संपण्यासाठीच प्रवास असतो
एक दिवस मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो... "
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळींना स्मरुण मी ट्रेकच्या आजच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात केली. पाच दिवसांपुर्वी सुरू झालेला आमच्या ट्रेकचा उगवतीचा प्रवास आज मावळतिला झुकला होता. गुरदुंग या स्वर्गीय सैदर्याने नटलेल्या ठिकाणाहून पाय निघत नव्हता परंतु हाती कितिही सुंदर आणि सुखद गोष्टी असल्यात तरी त्या सोडून देण्याशिवाय कधि कधि माणसांना पर्याय नसतो.
दिनांक 20 मे 2017 या दिवशी सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास आम्ही गुरदुंग या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. आजची वाट देखिल काल प्रमाणेच दाट आरण्यांतून जाणारी फुलांनी बहरलेली पायवाट होती. वाटेत उगवलेली करवंदाच्या आकाराच्या आंबटगोड स्ट्रॉबेरीजचा आनंद घेत आम्ही उतरत होतो. काही अंतरावरच कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आमच्या काणावर येऊ लागला. उत्सुकता वाढली तसे आम्ही भराभर उतरु लागलो आणि एका वळणावर पहातो तर काय शुभ्र दुधासारखा फेसाळलेला धबधबा. आम्ही आता एका दरीतून जात होतो आणि त्याच दरीतून वाहणार्‍या लहानशा नदीवर पाई चालणाऱ्यांसाठी एक पुल उभारण्यात आला होता हव तर दुधसागरची लहान प्रतीक्रूती म्हणा. त्या पुलावरून आम्ही भरपूर फोटो घेतलेत. खरतर पाणी पाहील की पोहता येणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला पाणीच सुटत. धबधबा पाहूनतर पाण्यात उतरण्याची फारच इच्छा होत होती परंतु मागुन येणारा गाईड राजन सारखे पुढे दामटत होता. अखेर नाईलाजाने आम्ही चालते झालोत. तिव्र उतार संपुन आता आमची वाट ही त्या सुंदरशा नदीच्या सोबतीला चालू लागली. गुरदुंग सोडून एका तासाने आम्हाला वाहण चालेल असा पंक्का रस्ता लागला. गुरदुंग या गावाला जाण्यासाठी आम्ही आलो तोच एकमात्र रस्ता होता आणि वरपर्यंत कुठलही वाहण जात नव्हते. दुर्गम भागातील ते नितांत सुंदर ठिकाण वर पहाडात दिसेनासे झाले होते.
आता आम्ही चालत होतो त्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर होते. जेसीबी आणि क्रशरचा आवाज शांतता भंग करित होता. जंगल तोडून तिथे रस्ता बनविला जात होता. पुन्हा एकदा आम्ही आधुनिक जगात येउन पोहचलो. जंगलतोड करून चाललेल बांधकाम पाहून मला अतिशय वाईट वाटले कदाचित येत्या काही वर्षांत आम्ही आलोत त्या पायवाटेची जागा हा रस्ता घेईल आणि माणसांच्या, वाहनांच्या वर्दळीपासुन अलिप्त या जंगलाची शांतता लोप पावेल. निसर्ग संपवून विकासाचा चाललेला हा अट्टाहास क्लेशदायक आहे. विकास हा इथला फक्त निसर्गच नव्हे तर इथल्या माणसांची निरागसता, संस्कृती आणि माणूसपण सार काही हिरावून घेईल. कदाचित भविष्यात येथील जंगल, पशू, पक्षी, माणस आणि त्या माणसांची संस्कृती दर्शवनार एक संग्रहालय तयार होईल आणि तेथे आपण तिकीट काढून पॉपकॉर्न खात या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करू. रस्त्याने जाताना जसे आम्ही पुढे जाऊ लागलो तस जंगल संपुण चहाचे मळे दिसु लागलेत आणि घर देखील दिसू लागलित. पुढे एका ठिकाणी दोन लहान नद्यांचा संगम होता. तिथेच पुलाचे कामदेखिल चालले होते. आम्ही एक नदी ओलांडून पलीकडे गेलोत आणि थोडे वर चढलोत. वर नदीला लागूनच काही लाकडी बांधकाम केलेली हॉटेल्स होती. सकाळचे 11.00 वाजले होते आणि आम्ही श्रिखोला या ठिकाणी येऊन पोहचलो होतो. तिथेच एका हॉटेलच्या अंगणात आम्ही पडाव टाकला नदीच्या काठावर मांडून ठेवलेल्या लाकडी खुर्च्यांवर बसलोत आणि कॉफी घेतली. अवखळत वाहणार्‍या त्या नदीच्या किनारी घेतलेल्या कॉफीचा आनंद काय वर्णावा. काही वेळाने पुन्हा प्रवास सुरू झाला. थोडेच अंतर कापल्यावर त्या नदीवर एक पुल लागला. लाकडी पाट्या टाकून बनवीलेला झुलता असा तो पुल होता. हिमालयातल्या त्या जगली नद्यांवर असेच पुल बांधले जातात. पहाडात थोडा जरी पाऊस झाला तरी नदी रूद्र रुप धारण करते म्हणून ही उपाययोजना. त्या सुंदरशा पुलावर बराचवेळ फोटोसेशन करून आम्ही पुन्हा वाट धरली. दोन पहाडांच्या मधुन वाहणार्‍या नदीला समांतर असा तो वळणावळणाचा रस्ता होता. Royal Enfield गाडी बनली आहे ती खास अशा रस्त्यांसाठी, नाहीतर आपले मर्द मावळे शहरातील ट्रॅफिकने वाहणार्‍या रस्त्यावंर क्लच आणि ब्रेक ओढत तिला हाकत असतात.(केवढा हा करंटेपणा?... असो).
आता रस्त्याच्या बाजुने घरांची गर्दी वाढू लागली होती. नदीच्या बाजुने झोपडीच्या आकाराची टुमदार लाकडी घर उभारली होती आणि प्रत्येक घराच्या बाहेर कुंड्यानमध्ये विविध रंगाची फुले बहरलेली होती. लालबुंद रंगाची, गोबर्‍या गालांची ही पहाडातली माणस फुलांची फारच शैकिण असतात. हिमालयातील हे थंड अल्हाददायक वातावरण हे माणसांनप्रमानेच फुलांच्या वाढीसाठी देखिल अनुकूल आहे. मे महिन्यात महाराष्ट्रातील बर्‍याच शहरात जेव्हा पारा 40 अंशाच्या च्या पुढे असतो तेव्हा आम्ही इथे हिरवळिचा आणि गुलाबी थंडीचा आनंद घेत होतो. मी चेष्टेच्या सुरात राजनला म्हटंलो 'कभि मई मे आणा हमारे यहा महाराष्ट्रमे. 40 डिग्री मे बोहत मजा आता है. हे ऐकून तो हसतच म्हणाला ' अरे इतनी गर्मि मे तो हम मर जायेगा '. खरोखर हिमालयातील शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणातून ही माणस रोजगारासाठी आपल्या कडिल प्रदुषण, गोंगाट , उष्णता आणि गर्दीने भरलेल्या शहरात कशी रहात असतिल. त्यात भर म्हणून आपल्यातले काही महाभाग त्यांना त्यांना चिनी म्हणून, ऊ शाबजी म्हणून चिडवतात. इथल्या लोकांच आरोग्य, शारिरीक क्षमता, संस्कृती, सामाजिक जाणीवा, देशप्रेमाची भावना सार काही आपल्या कडील शहरी so cold, self centered, selfish लोकांच्या मानाने उत्तम आहे. मग भारतीय असल्याचा अभिमान नेमका बाळगावा तो कुणी?
चालत चालत दुपारचे तिन वाजलेत तरी देखील रस्ता काही संपण्याचे नाव घेईना. आज आमच्या ट्रेकचा पाचवा दिवस होता आणि दररोज आम्ही दहा ते बारा किलोमीटर अंतर कापत होतो. कितीही कणखर असलित तरी सगळ्याचीच शरिर आता उत्तर द्यायला लागली होती. सततच्या चालण्याने कुणाच्या पायात फोड आले होते, कुणाला जखमा झाल्या होत्या तर कुणाचा पाय लचकला होता आणि यामुळे बरेच लोक लंगडत चालत होते. सह्याद्रीतले ट्रेक हे एक, दोन किंवा तीन दिवसांत संपतात इथे आमचा पाचवा दिवस चालला होता. मला खर कौतुक वाटल ते आमच्यातल्या काही जेष्ठ मंडळीच. या वयातली इतर मंडळी जेव्हा घरी पाय पसरून 'शि काय उकडतय' IPL पहात होती. तेव्हा आमच्यातले हे काही पंन्नशिच्या आसपासचे तरुण आम्हाला लाजवेल अशा उत्साहात ट्रेक करीत होते. यात महिलांची संख्या अधिक होती हे विशेष. या वयात हा शारीरिक आणि मानसिक थकवा बर्याचदा असह्य होतो. नंतर घरी पोहचल्यावर आम्हाला कळले की आम्ही प्रत्येकाने त्या पाच दिवसात अंदाजे तिन ते पाच किलो वजन कमी केले होते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेकिगसारखा दुसरा पर्याय नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.
वाटेने चालतांना लहान लहान गोरीगोमटी मुल शाळेतून परततांना दिसत होती. आजचा रस्ता बराच रूंद होता तेव्हा आम्ही आठ दहा ट्रेकर्स मस्करी करत, फोटो घेत आणि पुढच्या ट्रेकचे मनसुबे रचत सर्वात शेवटी चालत होतो. दुपारी 3.30 च्या सुमारास आम्ही अखेर रिम्बीक येथे येऊन पोहचलो. रिम्बीक हे त्या पहाडातल बाजारपेठेच गाव होत. आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करताच ट्रेकचे व्यवस्थापक श्रिमणी सरांनी आमच हसतमुखाने स्वागत केले. ट्रेक आम्ही एकदाचा यशस्वीपणे पुर्ण केला होता. हा ट्रेक पुर्ण झाल्याचा एकाच वेळी आनंद आणि दुःख दोघही वाटत होते. अंघोळीला गरम पाणी मिळत आहे हे ऐकून आम्ही पळतच सुटलो. पटकन खोलीत सामान टाकला आणि अंघोळीला गेलो. तब्बल पाच दिवसांनी गरम पाण्याने मी अंघोळ करत होतो. तेंव्हा अंघोळीसारख्या रोजच्या क्रियेतही किती आनंद असतो याची प्रचिती आली.
रात्री जेवणापुर्वी CAMP FIRE च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व लोक एका शेकोटीच्या भवती जमून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करित असतात. बाहेर पाऊस असल्याने आमचा CAMP FIRE एका हॉलमध्ये विदाउट FIRE च चालू झाला. अवघि विस मिनिटे अवधी असलेला तो कार्यक्रम आम्ही एक दिड तास खेचत नेला. आमच्या ग्रुपमधील काही तरुण मुलांना गाण म्हटलं म्हणजे हनि सींग आणि अरजित सिंगच्या पलिकडे ही काही असत हे माहीत नव्हते तर काही जेष्ठाना हनि सिंग नाव जरी ऐकले तरी प्रचंड मानसिक त्रास व्हायचा. तेव्हा दोन पिढ्यातल या द्वंद्वावर मी एक कल्पना सुचवली. दोन समुहांनी समारोपाची दोन वेगळी गित गावित असे ठरले. सर्व तरुण मुला मुलिंनी 'अच्छा चलताहू दुवाओमे याद रखना' हे गित गायल तर जेष्ठानी 'कभि अलविदा ना केहना '. ती आमच्या ट्रेकची अखेरची रात्र होती आणि वातावरण खरोखर भाऊक झाले होते. तेव्हा मैफील थोडी हलकी करावी म्हणून सुजीतने जोरजोरात तुम तो ठेहरे परदेसी गायल त्यात माझ्यासकट सर्वानिच सुर मिसळला आणि हसत खेळत मैफिलीचा अंत झाला. रात्रिच जेवण अप्रतिम होत. गंप्पा मारत, हसत आम्ही जेवण आटोपलीत आणि बाहेर निवांतपणे बसलोत आमचा ट्रेक खरोखर संपला होता आणि एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती. मागच्या एक महिन्यापासून मला ज्या ट्रेक शिवाय काहीही सुचत नव्हतं तो ट्रेक अखेर संपला होता. उद्या गाडीने दार्जिलिंगला पोहचून परवा सकाळीच आम्ही घराकडे निघणार होतो.
रात्री बिछान्यात मी कॅमेर्‍यातील फोटो पहात पडलो होतो. प्रत्येक फोटो सोबत कितीतरी माणसे, ठिकाण, घटना यांच्या आठवणी बंदिस्त झाल्या होत्या. माझ्या मनात विचार आला प्रवास ही खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी नविन माणस, नविन ठिकाण, नवा निसर्ग अनुभवन याहूनही सुंदर काही असत का. त्यातच ट्रेकिग विषयीतर काय बोलावे. पहाड, नद्या, जंगल, माळराण यातुन पाई चालतांना मिळणाऱ्या आनंदाची सर अजुन कुठल्याही प्रकारच्या पर्यटनातून मिळने केवळ अशक्य आहे. ट्रेकिगमध्ये आपण निसर्गाशी खर्या अर्थाने तादात्म्य पावतो, एकरुप होतो. ट्रेकमध्ये पडणारे श्रम हे देखील आनंददायीच असतात. प्रचंड परिश्रमानंतर शिखर सर करण्याची ती भावना तर अवर्णनीय आहे. प्रसंगी मरणाचे भयदेखिल शिखर सर करण्याचे हे आकर्षण थोपवू शकत नाही. ट्रेकिगबंद्दल अस म्हणतात की *It is not mountains we conquer but ourselves.*
पहाडांची ती विशालता आपल्याला नम्र बनविते, ट्रेक मधले परीश्रम कणखर, सहनशील बनवितात आणि तो निसर्ग उत्कटता देतो. जगाला दाखविण्यासाठी नव्हे तर जग अजुन स्वच्छपणे बघण्यासाठी ट्रेक करायला हवेत. माझा असा अनुभव आहे की प्रत्येक ट्रेक नंतर ट्रेकिंगची ती झिंग अजुन अजून चढतच जाते, हे वेड आपल्या मनाचा ताबा घेते. वैयक्तिक पातळीवर बोलायच झाले तर ट्रेकिग हे मी स्वतासाठी निवडलेले व्यसन आहे.
रोजच्या जगण्याचा कटकटी, चिंता, समंस्या कुणाला नाहीत. या सार्‍यातून येणारी मरगळ असल्या पर्यटनातून नाहीशी होत असते. परंतु त्यासाठी Tourist बनून
नव्हे तर Traveler बनुन पर्यटन करायला हवे. जगण्यातला कटकटी या रोजच्याच असतात परंतु आठवणी बनविन्याची संधी आपल्यालाच निर्माण करावी लागते. प्रवास हा सुरवातीला आपल्याला निशब्द करतो आणि नंतर याच भावना शब्दरूप होऊन कागदावर पाझरू लागतात. प्रवासवर्णन हि ठरवून किंवा आठवून लिहावी लागत नाही तर हे लिखाण काळजात बंद आठवणिना वाट मोकळी करून देण असत, म्हणून ते वाचनार्यालाही आनंद देत आणि लिहीनार्यालाही. हिमालयातील संदकफू हे ठिकाण जस मला उमगल तस मी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही लेखातून, फोटोतून, व्हिडिओतून त्याची पुर्णपणे अनुभुती मिळणे अशक्य आहे. म्हणून मी म्हणेन 'Don't listen what I say, just go & see'.
या आधीच्या प्रवास वर्णनांनप्रमाने संदकफू डायरी मी स्वतासाठीच लिहिली होती. सहजच Facebook, What's app वर टाकली आणि येणार्‍या प्रतिक्रियांमधून चक्रावून गेलो. कितीतरी ओळखिच्या तसेच अनोळखी व्यक्तींनी लिखाण आवडले असे कळविले आणि पुढिल भाग लवकर टाकण्याचि विनंती केली. खरतर मी अतिशय आळशी प्राणी आहे परंतु या लिखाणाची आपण वाट पहात आहात याच गोष्टीने आणि आपल्या अभिप्रायानी मला लिहीते केले आणि केवळ दोन भागात संपविण्याचा हेतूने सुरू केलेली लेखमाला सहा भागापर्यंत ओढता आली. आपणासर्वोचा मी खरोखर आभारी आहे. परंतु मला हे प्रामाणिकपणे वाटते की लिखाणाला मिळालेली ही पावती लिखिणापेक्षा आपल्या सर्वाच्या मनातील पर्यटनासाठी च्या आकर्षणाची आहे. शेवटी आपल्या सर्वांच्या आत एक जिप्सी दडलेला असतोच. ज्याला सतत प्रवास करावासा वाटतो, नव काही अनुभवावस वाटत आणि हे अस वाटन हेच जिवंतपणाच लक्षण आहे कारण अस म्हणतात...
*TO TRAVELL IS TO LIVE...*
आपलाच ट्रेकर
*विनय पाटिल*

*माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग पाच

चवथा दिवस :
'अबके हम बिछडे तो शायद कभि ख्वाबोमे मिले
जिसतरह सुखे हुए फुल किताबो मे मिले,
गम-ए-दुनीया भी गम-ए-यार मे शामील करलो
नशा बढता है जो शराबे शराबो मे मिले. '
आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहप्रसंगाची जी अगतिकता' अहमद फराज' या महान शायराने वरिल शेरात व्यक्त केली आहे अगदी त्याच अगतिकतेने आम्ही संदकफू हे ठिकाण दिनांक 19 मे 2017 या दिवशी सकाळी 8.30 वाजता सोडले. एव्हरेस्ट, काचंनजंगा, माकालू, लोहत्से, पंडिम अशी हिमालयातील उंत्तूग शिखरे याची देही याची डोळा आम्ही आज सकाळी सकाळीच येथुन पाहीली होती. स्वप्नपूर्तीच्या भावनेनेच आम्ही आमचा आजच्या प्रवासाला सुरुवात केली. आजची आमची वाट ही घनदाट आरंण्यातून जाणारी अरुंद उताराची पायवाट होती. कुठल्याही ट्रेकमध्ये अपघाताचा आणि दुखापतिचा सर्वात अधिक धोका हा उतरतांना असतो. एव्हरेस्ट मोहिमेतील गिर्यारोहकांचे सर्वात जास्त म्रूत्यू हे उतरतांना झाले आहेत यावरून वरील विधानाचे मर्म लक्षात यावे.
उतरणीचा रस्ता पाहून सुरवातीला आमचा वेग बराच होता. पायवाटेने तो पहाड उतरतांना आम्हाला वेगळाच उत्साह जाणवत होता. सुरवातीला उंचच उंच पसरलेल्या व्रुक्षांची जागा आता डोक्याएवढ्या बांबूच्या वनाने घेतली. मधेमधे रान मोकळ होउन चहोदुर पसरलेल्या हिमालयातील रांगा दर्शन देत होत्या. मध्येच रानफुलांनी बहरलेल एखाद सुंदर झाड नजरेस पडत होत. झाडांच्या पानावर दवबिंदू साचले होते आणि संपुर्ण रानातुनच ओलावा पाझरत होता.
ट्रेक करतांना प्रत्येकाचा आपला एक वेग असतो आणि प्रत्येकाने आपल्याच वेगाने चढायला आणि उतरायला हव. सुरक्षेच्या कारणाने सक्तीने सर्वाच्या सोबत समुहाने चालण्यात आपण ट्रेकचा आनंद घालवतो अस माझ प्रामाणिक मत आहे. साधारणपणे तासाभरात सर्व ट्रेकर्स मध्ये बरच अंतर पडल. आमच्यातली काही मंडळी बरिच पुढे गेली होती. मी त्यांच्या मागोमाग थोड्या कमी वेगाने उतरत होतो. 2012 साली मी आणि सुजीतने भर पावसात कळसूबाईचा ट्रेक केला होता. ज्यात उतरतांना पावसामुळे आमच्या पायवाटेचा अक्षरशः ओढा झाला होता. त्या अतिशय घसरड्या पायवाटेवर मी पाठीवर जड बॅग असताना नऊ ते दहा वेळेला पडलो होतो आणि काही ठिकाणी तर चंक्क घसरगुंडी प्रमाणे घसरत खाली आलो होतो. पडतझडत कसेतरी आम्ही खाली पोहचलो होतो आणि या सर्वात माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. ही दुखापत एवढि वेदनादायी होती की भविष्यात आपण कधि कुठला ट्रेक करणार की नाही असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. या अनुभवातून ट्रेक करतांना knee cap वापरण्याच आणि सावकाश उतरण्याच शहाणपण मला आल.
आतापर्यंत माझ मागच्या आणी पुढच्या मंडळीपासुन बरच अंतर पडल होत. बर्याच वेळापासुन मी एकटाच चालत होतो. या अशा वाटेवर एकट चालतांना मला जर कुठल्या प्राण्यांपासून खरोखर धोका होता तर ते म्हणजे अस्वल. अस्वल हा अतिशय आक्रमक प्रणि असतो तो एकट्या दुकट्या व्यक्तीवर हंल्ला करतांना कचरत नाही हे मला माहीत होतं. मी सुरक्षेसाठी वाटेतच वाळलेल्या एका बांबूची काठी हातात घेतली. माझ्या डोक्यात विचार आला जर खरोखरच झाडीतून अचानक अस्वल समोर आल आणि त्याला जर का बोलता आल तर माझ्या हातातली काठी पाहुन ते हसुन म्हटल असत "अस्वल के तापसे तुम्हे कोई बचा सकता है तो एकही चिज खुद अस्वल हा हा हा".परंतु तरीही उगाच स्वताच्या खोट्या समाधानासाठी मी ती काठी घेऊन चालू लागलो.
पुढे काही अंतरावर थोडा मोकळा परिसर लागला. गुडघ्या एवढ्या गवतात पुढे गेलेली मंडळी आरामाने पडली होती. त्यांना पाहुन बर वाटल. इथे आम्हाला मागुन येणार्‍याची वाट पाहत थांबायचे होते. पाणी पिऊन आणि उशाला बॅग घेऊन मि देखील आडवा झालो. परंतु काही क्षणातच गवतातील किड्यांनी कपड्यात, काणात घुसून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्यामुळे पुन्हा उठून बासावे लागले. 20 मिनिटे झालीत तरीही कुणी येण्याची चिन्हे दिसत नव्हती. आम्ही खान्याच्या वस्तू बाहेर काढल्यात आणि किड्यांमधुन मिळनारा प्रोटिन्सयुक्त आहार टाळत नाश्ता संपवला. अर्ध्या तासाने काही ट्रेकर्स आम्हाला येउन मिळालेत त्यानंतर एक दोन करत पाउन तासात सर्व मंडळी त्या मोकळ्या जागी जमली. मागुन येणाऱ्या काही ट्रेकर्सनी आपल्या पिलासह बसलेले अस्वल पाहिल्याचे सांगितले. म्हणजे मी मघाशी केलेल्या गोष्टी केवळ कल्पनारंजन नव्हत्या मी स्वताशिच म्हणालो आणि चालू लागलो.
मागच्या अडीच तिन तासांपासून आम्ही उतरत होतो आणि उतरतांना बुटात पुढे दाबली जाणारी पायाची बोट आणि पोटर्या आता दुखायला लागल्या होत्या. चरबीचे थरावर थर असलेल्या मंडळींना अधिक समंस्या जाणवत होत्या. आतापर्यंत आम्ही सहा किलोमीटर अंतर कापले होते अजून इतकेच अंतर आम्हाला कापायचे होते. वाटेतल्या रानफुलांचे आणि निरनिराळ्या वनस्पतीचे फोटो घेत आम्ही उतरू लागलो. माझ्या डाव्या गुडघ्याच जुने दुखणे हळूहळू डोके वर काढू लागले तसा मी वेग अजूनच कमी केला. इथे पायाला काही दुखापत झाली असती तर झोळीत टाकून इतरांच्या खाद्यावरूनच त्या व्यक्तीला खाली नेता येणे शक्य होते एवढ्या आडवाटेने आमचा प्रवास चालला होता. विकासापासून तो प्रदेश अस्पर्शीत होता आणि म्हणूनच एवढा सुंदर होता.
दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास उतारावर काही लाकडी घर दिसु लागलीत ते दुष्य पाहून जिवात जिव आला. वाटेत एका भल्या मोठ्या शिळेला लागुन एक लाकडी बाक दिसला तिथेच मी आणि सुजीतने बॅग टेकवल्यात आणि विश्रांतीसाठी बसलोत. काही वेळाने आमच्या मागून एक तरुण जोडप आणि त्यांच्यासोबत उतरणारा एक स्थानिक गाईड दिसला. तेही आमच्या समोरच्या दगडावर येउन बसलेत. नेहमीप्रमाणे मी चौकशी केली तेव्हा कळले की सलमान चैधरी नाव असलेला तो युवक व्यवसायाने डॉक्टर होता आणि फराह हि त्याची मैत्रीण एग्रिकल्चर इंजिनिअर होती. हे दोन्ही मुळचे असामचे रहिवासी होते आणि फक्त दोघेच त्या गाइडच्या सोबतीने हिमालयातील दर्याखोर्यातून भटकंती करत होते. मागच्या चार दिवसाच्या प्रवासात फक्त हे दोघेच आम्हाला पाइ चालतांना वाटेत भेटलेत यावरून त्या निर्मनुष्य भागाची कल्पना यावी. मला त्या जोडीचे फार कौतुक वाटले. गर्दीने भरून वाहणारी भारतातली इतर पर्यटन स्थळ सोडुन हे लोक असुविधानी भरलेल्या हिमालयातून भटकत होते. नक्कीच इतरांच्या तुलनेत जागाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता.
मला प्रवासात भेटणारी अशी निरनिराळी माणस आणि विशेष म्हणजे त्या माणसांचे जगाकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टीकोन फारच आकर्षित करतात. पर्यटनात आपण खरे श्रीमंत होतो ते इथे. अस माणस वाचुन श्रीमंत होण्यासाठी आपले परकेपणाचे, शिष्टाचाराचे चष्मे काढुन ठेवावे लागतात आणि मोकळ व्हाव लागत. जे AC च्या प्रवासातून, लक्झरीयस हॉटेलात राहुन आणी महागड्या टुर पॅकेजेस मधुन शंक्य होत नसत. प्रवासातला साधेपणा आणि असुविधा अस मोकळ होन सोप बनविते. आपण नाही का एसटी च्या प्रवासात ती सुरळीत चालत असते तो पर्यंत आपल्याच मोबाईल मध्ये मग्न असतो. शेजारच्या सहप्रवाशाशी चुकुन देखिल बोलत नाही. परंतु तिच एसटी पंचर होऊन थांबते तेव्हा महामंडळाला शिव्या देण्याच्या मुद्द्यांवरून का असेना एकदुसर्याशी बोलते होतो. माझा असा अनुभव आहे की प्रवासातल्या या असुविधाच त्या प्रवासातल्या गोड आठवणींचा ठेवा मागे ठेउन जातात. अस म्हणतात की *' You can always make money, but you can't always make memories '*.
दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आम्ही गुरदुंग या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलोत. गुरदुंग हे पहाडाच्या उतारावर ठराविक अंतरावर वसलेल्या लाकडी घरांचे गाव आहे. दुरवर पसरलेल्या हिमालयातील पहाडांच्या रांगा, उतारावरील टुमदार लाकडी घर, घरांच्या भवती परसात फुललेली विविधरंगी फुलं,बाजुलाच पहाडातुन आवाज करत वाहणारी नदी, वाटेने उगवलेली करवंदाच्या आकाराची आंबट गोड लालबुंद स्टॉबेरी, हवेतून वाहणारा गुलाबी गारवा, माझ्या उभ्या अयुष्यात मी पहाडातल एवढ सुंदर ठिकाण पाहिल नव्हत. आमच्या ट्रेकच्या प्रत्येक ठिकाणाच वैशिष्ट्य वेगळ होत. टम्बलिंगच घर सुंदर होत, कालीपोखरीचा सुर्यास्त सुंदर होता, संदकफू येथुन दिसणारी शिखर सुंदर होती परंतु गुरदुंगच निसर्ग सैदर्य अवर्णनीय होत. पाहताक्षणी प्रेमात पडाव एवढ सुंदर हे ठिकाण होत.
चार बाजूला बांधलेली लाकडी घर आणि मधोमध हीरव मोकळ अंगण अशा सुबक रचनेचे आमचे आजचे हॉटेल होते. दुपारी जेवण करुन आम्ही थोडा आराम केला आणि संध्याकाळ मजेत शेरोशायरी आणि गझलेच्या मैफीलत घालविली. चोहीकडे जेवढा सुंदर निसर्ग होता तेवढिच आमच्या समूहात काही दर्दी माणसे देखिल होती. मराठी माणूस म्हणजे 'गाणे आणि खाणे' या दोन गोष्टीवर आमच्या प्रमाणेच प्रेम करणारी माणसे या ट्रेकमध्ये आम्हाला लाभलीत. ज्यात धुळेकर डॉ. संजय चित्ते होते तसेच त्यांच्या पत्नी आणि अनेक कलात निपुण सौ. रुपाली चित्ते होत्या. डॉक्टर चित्तेंची कंन्या आर्किटेक्ट आणि उत्कृष्ट फोटोग्राफर सृष्टी होती. औरंगाबादचे व्यवसायाने शिक्षक असलेले पवार दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा संकेत होता. नाशिकच्या नावाजलेल्या चित्रकार सौ. अर्पणा चौगुले होत्या, मंगल सोनवणे होत्या , धुळेकर डॉ. सौ. मनिषा भावसार होत्या आपल्या दोनही मुलांसोबत आलेल्या सौ. प्रेरणा बोरसे होत्या, शांत आणि हसमुख कॉलेजकुमार दर्शन होता, अवघ्या 13 वर्षे वयाचा परंतु प्रचंड कणखर असा अभिषेक होता, हुशार आणि कुतूहलाने भरलेला रोहण होता, अतिशय समजदार आणि सालस अशि सई होती, सेल्फिक्विन साक्षी होती, जय- विरू असे रोहण आणि ऋतूज होते सदैव मदतीस तत्पर असा कौस्तुभ होता, हॅपी गो लकी राज होता, आणि सोबत माझ्या प्रत्येक ट्रेकचा पार्टनर सुजित होता. असा आमचा बराच मोठा समविचारी लोकांचा गोतावळा जमला होता.
रात्री जेवणानंतर आम्ही काही तरूण मंडळी बाहेर पाउस चालू असतांना एका झोपडीत शेकोटिची उब घेत बसलो होतो. आजचा प्रवास सुंदर होता परंतु उद्या आमच्या ट्रेकचा अखेरचा दिवस होता. मागच्या चार दिवसांपासून मोबाईलला रेंज नसल्याने जगाशी जवळपास आमचा संपर्क तुटला होता. या ट्रेकमध्ये सहभागी झालेली मंडळिच मागच्या काही दिवसांपासून आमच विश्व होत्या. आमच्यात असलेल्या सर्व औपचारिकता आता गळुन पडल्या होत्या सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. उद्या हे सर्व संपणार होत. बरिच रात्र झाली तरी कुणाचाही पाय निघत नव्हता. आपापल्या अयुष्यातल्या समस्या, चिंता, कटकटी विसरून सारे इथे जमले होते आणि रंगात आलेली ही मैफिल कुणालाही सोडवत नव्हती. त्या रात्री मला उगाच गुलजार यांच्या या ओळी सारख्या सारख्या आठवत राहिल्या ...
दिल ढुढता है फिर वही फुरसत के रात दिन,
बैठे रहे तसंब्बुरे, जाना किये हुऐ...
*To be continued...*

*माझे ट्रेकानूभव....संदकफू डायरी...भाग चार

" The poetry of earth is never dead" असे John Keats या ब्रिटिश कविचे प्रसिद्ध वांक्य आहे. निसर्गातली हवा, वाहत पाणी, किलबिलाट करणारी पाखरे याचां आवाज हा कधिही थांबत नसतो. या ओळिची अनुभुती घेण्यासाठी हिमालयासारख दुसर ठिकाण नाही. 18 मे 2017 या दिवशी पहाटे जाग आली ती कावळयांच्या अतिशय तिव्र काव काव या आवाजाने. खिडकीतून बाहेर दिसणारे आपल्याकडिल कावळ्यांंच्या दुप्पट आकाराचे आणी केसांचे दाट आवरण असणारे हे हिमालयातील कावळे होते.
बाहेर उजाडलच होत तेव्हा ब्रश करुन चहा घेतला. अंघोळीचा तर प्रश्नच नव्हता. तिन दिवसांपूर्वी दार्जिलिंग सोडतांना शेवटची अंघोळ झाली होती. हिमालयातील या दुर्गम ठिकाणी आधिच पाण्याची कमतरता असते. त्यात एवढ्या लोकांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळणे केवळ अशक्य आणि एवढ्या थंडीत गारपाण्याने अंघोळ करणारा कुणीही योगिपुरूष आमच्यात नव्हता.
सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास बाहेरच धुक निवळल आणि स्वंच्छ सूर्यप्रकाश पडला. समोरच्या एका टेकडीवर चढल्यावर आम्हाला आज जिथे पोहचायच होत ते संदकफू हे ठिकाण दिसत होत. आज आम्हाला फक्त सात किलोमीटर अंतर चालायचे होते. म्हणून सारे काही निवांत चालले होते.
सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास आम्ही कालीपोखरी सोडून संदकफूला जाणाऱ्या वाटेला लागलो. सुरवातीला थोडा चढ लागला नंतर मात्र रस्ता बर्‍यापैकी सपाट होता. आमच्या एका बाजूला पहाड होते तर दुसरीकडे खाई. काही अंतर चालून गेल्यावर रस्त्याच्या कडेला काही लाकडी घर दिसलीत. बाहेर एक वयस्कर स्री आपल्या पाठीवर दगडांनी भरलेली थैली खालून आणुन अंगणात टाकत होती. हे पाहून गारच पडायला झाले. आम्ही ट्रेकिंग म्हणून जे काही करीत होतो ते इथल्या लोकांचे रोजचे जगणे होते.
साधारणपणे तिन किलोमीटर अंतरावर भिखाय भंजन हे ठिकाण आले. या ठिकाणाची उंची होती 3280 मिटर्स. इथे एक चबुतर्यासारख बुद्ध प्रार्थना स्थळ होत. थंडी बर्‍यापैकी जाणवत होती. काही वेळ विश्रांती करून पुन्हा चालायला लागलोत. आता चढ अतिशय तिव्र होता आणि हवेतील आॅक्सिजनच प्रमाणही कमी झाले होते. थोडस चालल तरी थकवा जाणवत होता. हवा अतिशय वेगाने वाहत होती आणि झाडानमधुन वाहताना तिचा आवाज भयावह वाटत होता. धुकेही दाट होते. रात्रीच काय परंतु दिवसाही कुणी एकट येण्यास धजनार नाही असा तो निर्मनुष्य रस्ता जाणवला. पुढे काही अंतरावर आम्हाला मुक्तपणे चरणारे याक दिसलेत. आम्ही याक हा प्राणी पहिल्यांदाच पहात होतो म्हणून फोटो घेण्यासाठी धावलो. आम्हाला येतांना पाहून ते अजून लांब धावलेत. कदाचित ते देखिल आमच्या सारखे प्राणी पहिल्यांदाच पहात असावेत. दाट धुक्यातून मजल दरमजल करत आम्ही चालू लागलोत आणि दुपारी 1.00 वाजेच्या सुमारास संदकफू येथे येऊन पोहचलोत. या ठिकाणाची उंची होती 3636 मिटर्स. आम्ही अखेर पश्चिम बंगाल राज्यातील सर्वात उंच ठिकाणी येऊन पोहचलो होतो. संदकफू हे पहाडांवर चढ उतारावर वसलेले आठ दहा लाकडी घरांच एक सुंदर ठिकाण आहे. याठिकाणी मध्यभागी भारतीय सेनेचा एक तळ आहे आणि त्याला लागूनच चढावर ठराविक अंतराने पर्यटकांसाठी बनविलेली लाकडी हॉटेल्स आहेत. आमची व्यवस्था एका तिनमजली लाकडी हॉटेलमध्ये करण्यात आली होती. चालून चालून आम्ही थकलो होतो. तेव्हा पटकन रूम ताब्यात घेतली कपडे बदलले, जेवण केले आणि मस्तपैकी झोप काढली. दुपारी 4.00 वाजेला सुजीत, डॉ. चित्ते, जॉय आणि मी आम्ही चौघेजण बाहेर पडलोत. बाहेर प्रचंड थंडी होती. आम्ही एका सुंदरशा लाकडी हॉटेलमध्ये चहा घेतला आणि फेरफटका मारावा म्हणून चालायला लागलोत. काही अंतर चालल्यावर फुलांनी बहरलेला परिसर लागला तेथे काही फोटो घेतलेत. तिथे जवळच असलेल्या टेकडीवर आम्हाला काही झेंडे दिसलेत. ते बौद्ध धर्माचे एक प्रार्थना स्थळ होते तिथुन नजारा अजून सुंदर दिसणार या कल्पनेने मी आणि सुजीत अतिशय अरुंद वाटेने वर चढलो. बहूतेक संदकफू येथिल ते ते सर्वात उंच ठिकाण होते. आम्ही होतो त्यापेक्षा दुसर कुठलही ठिकाण आम्हाला उंच दिसत नव्हते. शिखरावर असण्याची ती भावना अद्वितीय स्वरुपाची होती. 3636 मिटर्स उंची असलेल्या टेकडीवर जर अस वाटत असेल तर MOUNT EVEREST शिखरावरून काय वाटत असेल याची कल्पना केलेलीच बरी.
या उंच टेकडीवर हवेपासुन बचावासाठी कुठलाच आडोसा नव्हता आणि वेगाने वाहनारे गार वारे चांगलेच बोचत होते. स्थानिक नेपाळी भाषेत संदकफू या शब्दाचा अर्थ 'संदक-गार आणि फू - हवा' असा होतो. आणि हे ठिकाण आपल्या नावाला चांगलच जागत होत.
इथे अधिक वेळ थांबन कठीण होणार होत परंतु येथूनच आम्हाला दिसणार होती हिमालयातील काही अतिउंच्च शिखर. समस्या फक्त एकच होती चहोदुर पसरलेल्या दाट धुक्याची. आम्ही चितेंत होतो जे शीखर पाहण्यासाठी आपण इथे आलोत ते आपण वास्तवात पाहू की पुन्हा घरी जाऊन गुगल इमेजेस मध्येच पाहू हे आम्हस ठाउक नव्हते. आमचा मार्ग काढत काही वेळाने ग्रूपमधले इतर काही ट्रेकर्स आम्हाला येउन मिळाले. काही वेळाने आम्हाला वर चढलेल पाहून इतर दोघ तिघही आलेत. मी सहजच ' कहासे ' म्हणून विचारले तर त्यातला एक म्हणाला 'ढाका, बांग्लादेश'. ते विदेशी आहेत हे एकुण मला चेव आला. मी आठ दहा प्रश्न त्यांना एका श्वासांत विचारून टाकलेत. त्याच्यातला एक माझ्या सारखाच गंपिष्ठ निघाला. मग काय बांग्लादेश क्रिकेट टीमने नेमक कुणाला खेळवायला हव इथपासून ते बाहुबली का पहावा इथपर्यंत अनेक संल्ले मी या माझ्या बांग्लादेशी मित्रांना देउन टाकलेत. त्याचा परतावा म्हणुन की काय त्यानिही काही बांग्लादेशी चलणि नोटा आम्हाला आठवण म्हणून देउ केल्यात त्यांनाही लगेच घेउन टाकल्यात. त्यांच्याशी त्या थोड्या वेळात केलेल्या संभाषणावरून जाणवले की वेगळा धर्म आणि वेगळी भाषा असलेली हि विदेशी माणस अगदी आपल्यासाखिच आहेत. तेही आपल्या प्रमाणेच हिमालयाच्या भेटीला आली आहेत आपल्या देशाच्या सिमा ओलांडुन.
धुक काही हटण्याच नाव घेइना तेव्हा अधांर पडायला लागल्यावर वैतागून आम्ही खाली उतरलो आणि हॉटेलला आलो. रात्री जेवण करून लवकर झोपलो परंतु झोप काही येईना. सु सु करत प्रचंड आवाज करत वाहनारे वारे खिडकितल्या फटीतून सरळ आत येत होते.
रात्री उशिरा डोळा लागतो नलागतो तोच पहाटे 4.00 वाजेला जोरदार शिट्टीच्या आवाजाने झोपमोड झाली. सूर्योदय पहाण्यासाठी जॉय सर्वाना उठवत होता. मी बाहेर येऊन पहिल तर सुंदर चांदण पडल होत. मी आनंदाने धावतच कॅमेरा घेण्यासाठी आत जाउन येतो तो काय पुन्हा धुक.'इस तरह के बिहडोमे पलक झपकतेही मोसम के हालात बदल सकते है' हे बेअर ग्रिल्सच वाक्य पुन्हा आठवल. बाहेर हाड गोठवणारी थंडी पडली होती. नंतर कळल की हिवाळ्यात सकाळी 9.00 वाजेपर्यंत बिछान्यात लोळनारे आम्ही सूर्योदय पहाण्यासाठी त्या दिवशी एक डिग्री सेल्सिअस तापमानात पहाटे 4.00 ला उठलो होतो. धूक हटत नव्हत आणी थंडी सहण होत नव्हती म्हणून आम्ही पुन्हा एकदा रुमला आलोत. झोपेच खोब्र झालच होत तेव्हा मी उगाच कॅमेरातले फोटो पहात बसलो आणि थोड्याच वेळात खिडकी बाहेर चंक्क सुर्यकिरण दिसलेत. मी तसाच धावत बाहेर आलो आणि सनराइज पॉईंटला पोहचलो 19 मे 2017 ची ति सकाळ आमच्यासाठी अविस्मरणीय नजारे घेऊन आली होती. पूर्वेला सुर्य वर आला होता, ढग पुर्णपणे नाहिसे झाले होते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात काचंनजंगा हे हिमाच्छादित शिखर चमकत होत. आमच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते आणि आनंदाने आम्ही चंक्क ओरडत होतो.
काचंनजंगा हे शिखर आपल्याला एकाच वेळी कुंभकर्ण आणि पंडिम या दोन शिखांराच्या सोबत दिसत. या शिखरांच्या आकारावरून कुणितरी व्यक्ती झोपली असल्याचे भासते. स्थानिक लोक यालाच स्लिपिंग बुद्धा म्हणून ओळखतात. 8586 मिटर्स उचिंच हे शिखर चढाईसाठी जगातील सर्वात कठीण शीखर म्हणून ओळखले जाते. या शिखरांच्या डावीकडे तिन शिखरांचा एक समुह दिसतो ज्याला थ्री सिस्टर्स म्हणून ओळखतात. आणि याच्याच थोडे डावीकडे दिसते लोहत्से आणि मकालू या दोन शिखरांच्या मधोमध आहे जगातील सर्वात उंच शिखर MOUNT EVEREST.
EVEREST वरच एडमंड हिलरी यांच :शिखरावरून' बेअर ग्रिल्सच 'मड, स्वेट, टिअर' अशी काही पुस्तके आणि कितीतरी डॉक्युमेंटरी आणि सिनेमे मी पाहीले होते. कितीतरी गिर्यारोहक जे शिखर सर करण्याच स्वप्न घेऊन जगलित आणि मेलित ते शिखर मी डोळ्यांनी पहात होतो.
हिमालयातील हि उत्तुंग शिखर आपल्याला उन्नत करतात, प्रेरणा देतात. जे अस्तित्व आणि ज्या चिंता घेऊन आपण जगतो ते सार किती क्षुद्र आहे याची जाणीव करून देतात. निसर्गाच हे विराट रूप पाहून माणूस थक्क होतो, स्तंभित होतो, आत्ममग्न होतो. प्रत्येक व्यक्तीने मानवनिर्मित आश्चर्य पाहण्याऐवजी निसर्गातली हि आश्चर्य बघावित अस मला मनापासून वाटत. कारण मानव निर्मित आश्चर्य हि प्रत्येक कालखंडात बदलत असतात परंतु निसर्गातील हि आश्चर्य हजारो वर्षांपासून तशीच आहेत अविचल, अभेद्य, स्वप्नवत ज्यांना पाहुन हिंदीतल्या कुठल्याशा लेखकाच्या या ओळी आठवतात 'मेरा स्वप्न है के मे स्वप्न देख सकू'...
मी शक्य तेवढे ते क्षण कॅमेर्‍यात टिपण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजाने हॉटेलला आलो. आम्ही खुष होतो कारण आमचा इथे येण्याचा हेतू सांध्य झाला होता. आता पुढच्या दोन दिवसात वेगळ्या सुंदर वाटेने खाली उतरायचे होते. परंतु ट्रेकिंग मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. चढणा आसान है उतरना मुश्किल...
*To be continued*

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...