Monday, 7 February 2022

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है...

विनय पाटील


स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो तू मला शिकवीली गीते


कवी ग्रेस यांच्या या ओळी लतादीदींच्या स्वरात ऐकल्या होत्या आज लता दीदीं साठीच या ओळी गाव्या लागत आहे ही मोठी शोकांतिका आहे.

 माणसं गेल्यानंतर आपल्या गुणदोषांसकट अनेकदा महान म्हंटली जातात. काही सामाजिक आणि राजकीय गरजापोटी  बऱ्याचदा काही व्यक्तीवर महानता लादली जाते परंतु आपल्या जिवंतपणी अख्यायिका बनण्याचे भाग्य थोड्या लोकाना लाभतं. अशीच एक व्यक्ती काल अनंतात विलीन झाली आणि सबंध देशाला वाटलं की आपल्याच घरातील कुणालातरी आपणं परके झालो.

  नव्वदीच्या दशकात माझ्यासारख्याच शाळेत जाणाऱ्या पिढीला हे आठवत असेल की आमची सुरुवात ही सकाळी रेडिओ वर लता दीदींच्या  आवाजाने व्हायची. कधी पसायदान तर कधी जयोस्तुते कधी गजानना श्री गणराया तर कधी गगन सदन तेजोमय असं उत्तम, उदात्त आणि उन्नत शब्द स्वर आणि संगीत ऐकण्याचा तो काळ होता.  लता मंगेशकर आणि त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळेच संत ज्ञानेश्वरांचे पसायदान कबिराचे दोहे, मीराबाईची भजन आणि सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत कविता आमच्या पिढीने अनुभवल्या.

 हे दीदींचे आणि हृदयनाथ यांचे फार मोठे उपकार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या या पिढीवर आहेत. नव्वदीच्या दशकात रेडिओवर जुनी सदाबहार गीत कानी पडतच असायची सोबतीला टीव्हीवर आणि टेपरेकॉर्डर वर कधी मैने प्यार किया तर कधी हम आपके है कौन , दिल तो पागल है यांसारख्या चित्रपट गीतांमधून दीदी चे स्वर भेटत राहायचे. परंतु यारा सिली सिली आणि जिया जले ही गीत जेव्हा मी ऐकलीत तेव्हा एखाद्या गीताने वेड लागण काय असतं हे प्रत्यक्ष अनुभवलं. रुदाली मधील झुटी मुटी रतिया ही असाच काहीसा प्रकार आहे. टेपरेकॉर्डर नंतर सीडी आणि सीडी प्लेयर चा जमाना सुरू  झाला होता. तेव्हा आमचे कॉलेजातील संपूर्ण लिखाण काम हे कधी किशोर कुमार, लता मंगेशकर  तर कधी मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या स्वरांच्या साक्षीने पूर्ण झाले आहे.

  काळाच्या प्रवाहात थोडं मागे गेलं तर कळतं की लता मंगेशकर या गायिकेने गीतांचा किती प्रचंड मोठा खजिना निर्माण करून ठेवला आहे. 

लता दीदी ने गायलेले नेमके कुठले गीत आठवावे असे झाले आहे परंतु काही खास मर्मबंधातील ठेव असलेली गीत म्हणजे  चलते चलते (पाकीजा), सोर्स बरस की , बडा नटखट है रे, आज फिर जीने की तमन्ना, नदिया किनारे, मेरे नैना सावन भादो, तेरे बिना जिंदगी से, अजीब दास्ता हे ये, माईरी मैं कासे कहू, लग जा गले , निंदिया से आई बहार आणि अशी कधीही न संपणारी यादी.

   अनेक महान गायकांना चांगला आवाज लाभला आहे त्यातच बरेच प्रचंड मेहनत करून पट्टीचे गायक बनले आहे. कुणी अतिशय तरण आणि मखमली सूर घेऊन गजलेत साम्राज्य निर्माण करणारा जगजीत झाला तर कुणी माधुर्याने ओतप्रोत रफी बनला कुणी दुःख आणि आनंदाचा जादुगार किशोर झाला तर कुणी चिरंतन वेदनेचा आवाज मुकेश झाला परंतु दिदी वेगळ्या भासतात या सर्वां गुणा सोबतच विधात्याने दीदीच्या स्वरांना एक ईश्वरीय देणगी दिली जी प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीला जाणवत राहते परंतु शब्दात व्यक्त करता येण केवळ अशक्य. दीदींचा आवाज या ऐकणाऱ्याचा सरळ परमेश्वराशी नाळ जोडून द्यावा असा आहे.

  दीदी जन्माने मराठी होत्या म्हणून मराठी माणसाचे भाग्य इतर भारतीय माणसांपेक्षा अधिक उजळलं आणि मेहंदीच्या पानावर सारख्या भावगीतापासून तर सुन्या सुन्या मैफिलीत सारख्या गजले पर्यंत आणि राजसा जवळ जरा बसा सारख्या लावणीपासून तर गजानना श्री गणराया सारख्या भक्ती गीता पर्यंत मराठी गीतांचा खजिना रसिकांना उपलब्ध झाला. मराठी चित्रपटातील दीदींनी गायलेली गीत आणि दीदीचे साधी माणसं या चित्रपटातील संगीत हा लेखाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो.

  माझे आजोबा आयेगा आनेवाला च्या पिढीतील होते वडील कभी कभी ऐकत मोठे झाले मी लहान असताना दूरदर्शन वर मिले सुर मेरा तुम्हारा ऐकत मोठा झालो त्यात दीदी जेव्हा सूर की नदिया हर दिषा से बेहते सागर मे मिले ही ओळ गायच्या तेव्हा अंगावर काटा यायचा. ज्याला आजकाल शुद्ध मराठीत goosebumps म्हणतात.

  दीदी या एका पिढीच्या गायिका नव्हत्या तर एका युगाच्या गायिका होत्या. २०व्या शतकात १९५० ते २००० या पन्नास वर्षाच्या कालखंडात या गायिकेने भारतीय संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. अगदी शास्त्रीय संगीताची जाण असलेला तज्ञ गायक असो की रस्त्यावर भाजीपाला विकणारा सामान्य व्यावसायिक सर्वांनाच एकाच प्रमाणात आवडणं हे सचिन, अमिताभ अब्दुल कलाम आणि लता मंगेशकर अशा काही मोजक्याच नावांना साध्या आहे . भारतीय चालू सामाजिक आणि राजकीय परिस्थिती तसेच कमालीचा वाढता जातीयवाद आणि संकुचितपणा यांच्या पार जाणाऱ्या व्यक्ती फारच थोड्या उरल्या आहेत त्यातील एक व्यक्ती या देशाने काल गमावली.

गेलं शतक हे बुद्धीसाठी अल्बर्ट आईन्स्टाईन अभिनयासाठी चार्ली चापलीन समाजकार्यासाठी महात्मा गांधी आणि संगीतासाठी लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखलं जाईल.

लता मंगेशकर हे परिपूर्णतेचा नाव आहे, हे कलेच्या प्रती असलेल्या सचोटीच नाव आहे, दैवी प्रतिभेच नाव आहे, अफाट कर्तुत्वाच नाव आहे आणि माझ्या सारख्या ( हवं तर अंध म्हणा ) भक्तांसाठी साक्षात माता सरस्वती च नाव आहे. आपल्या जयोस्तुते या काव्यात स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते'

सावरकरांना अभिप्रेत असलेली स्वतंत्रते भगवती ही आजच्या काळातील माता सरस्वती लतादीदी आहेत असे मला वाटते. उत्तम, उदात्त आणि महान गोष्टींच्या निर्मितीचा ध्यास दीदींच्या जगण्याचा गाभा होता. एवढं दर्जेदार काम एवढ्या प्रचंड प्रमाणात करणं ‌ यासाठी दैवी देणगीच असायला हवी. माझ्या एका मित्राने मला सांगितलेला किस्सा त्यांच्या विद्यापीठात एकदा एक विदेशी विद्यार्थी भारतीय संस्कृती शिकण्यासाठी आला होता तेव्हा त्याने एकदा प्राध्यापकांना विचारलं

What is essence of Indian culture.

तेव्हा रेडिओ वर लता दीदी ची गाणी ऐकत असलेले प्राध्यापक उत्तरात म्हणाले

Listen carefully, this voice is essence of Indian culture.


खरोखर आनंद, दुःख , प्रेम , विरह सर्वच मानवी भावनांसाठी आणि होळी, दिवाळी, विवाह, अशा भारतीय सन उत्सवांसाठी दीदींनी कितीतरी गीत गाऊन ठेवली आहेत. एक व्यक्ती एका जन्मात किती प्रचंड कार्य करू शकते याचं लता दीदी एक उदाहरण आहे. मी आकाशवाणीवरून निवेदक म्हणून काम करीत असताना लतादीदींची खास कमी लोकप्रिय गाणी श्रोत्यांना ऐकवत आलो आहे. हे सर्व करताना आपण कुठलेतरी पुण्य कर्म करतो आहोत अशीच भावना माझ्या मनात निर्माण होते. कितीतरी दुःखितांचे दुःख दीदींच्या स्वरांनी कमी झालं असेल आपल्या स्वरांच्या मधून त्यांनी करोडो लोकांना सात दशके असीम आनंद दिला आहे. पैशातच काय परंतु कुठलाही पुरस्कार या आनंदाची परतफेड करू शकणार नाही.

ना.धो. महानोर, ग्रेस, गुलजार, सुरेश भट, बा.भ.बोरकर, साहिर लुधियानवी, शैलेंद्र असे सारस्वत कदाचित फक्त शब्दांमधून जेवढे पोहोचू शकले नसते तेवढे ते लता दीदींच्या आवाजातून जनमाणसात खोल उतरले आहेत.

दिदी जग सोडून गेल्याने काय झालं असेल.

जसे की घरात फुलदाणीत ताजी फुलं असली आणि नसली तरी घराला फारसा फरक पडत नाही परंतु त्यांच्या असण्याने घराचं घरपण जिवंत वाटतं अगदी तसं गेल्या काही वर्षांपासून दीदी गात नव्हत्या परंतु त्यांचं या जगात असंन सुद्धा हे जग अधिक सुंदर बनविनार होत. माझ्यासारख्या करोडो संगीत प्रेमी वर आमच्या जन्माच्या आधी लता दीदीं च्या रूपाने सांगीतिक संपत्ती निर्माण करून परमेश्वराने प्रचंड उपकार केले आहेत. आता यानंतर दिदी आपल्यात नाही हे वास्तव स्वीकारून जगणे थोडे कठीण वाटते. गुलजार किनारा या चित्रपटात दीदींच्या आवाजात म्हणतात तसे


वक्त के सितम कम हसी नही

आज है यहा कल कही नही

वक्त से परे अगर फिर मिले कही

मेरी आवाज ही पहचान है

गर याद रहे...


कदाचित दीदी म्हणत आहेत दुसऱ्या जगात मी तुम्हाला नक्की भेटेन फक्त आवाज लक्षात असू द्या...

Friday, 24 July 2020

चिनी वस्तूंवरील भारताची बंदी

चिनी वस्तूंवरील भारताची बंदी ही चीनला योग्य प्रत्युत्तर आहे का की ते आंधळ्या देशभक्ती च्या नादात उचललेल अव्यवहार्य आणि मूर्खपणाच पाऊल आहे...
लेखन : विनय पाटील
या दोघेही गोष्टी लॉजिकल आहेत.
आपली उत्पादने स्वस्त नाहीत म्हणून लोक ती विकत घेत नाहीत म्हणून चीन निर्मित वस्तू संपूर्णपणे टाळणे ओपन मार्केट आणि ग्लोबलायझेशनच्या जगात थोडं कठीण वाटतं सोबतच जपानी लोकांमध्ये असलेली देशभक्ती आणि विजिगीषू वृत्ती आपल्यात यायला हवी ज्यात थोडं महाग असल तरी चालेल परंतु आपल्याच देशातील उद्योगांना आणि माणसांच उत्पादनांच समर्थन करायचे.
परंतु खरं सांगू प्रश्न अतिशय मुळाशी येऊन पोहोचतो तो आपल्या नैतिकतेशी. आज चीन हा भारतापेक्षा सर्वच बाबतीत उजवा आहे (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही सोडून) परंतु मग आपण चीनसारख्या वस्तू का बनवू शकत नाहीत आपल्या इंजिनिअर्सचा सगळ्या जगात बोलबाला असताना आपल्याकडे प्रोडक्शन का कमी आहे. माझ्या ओळखीचे एक उद्योजक आहेत ते म्हणतात चीनमध्ये आपल्याकडील रोजगाराच्या तीन पट रोजगार कामगारांना मिळतो तरीसुद्धा जगातील कंपन्यांना चीनमध्येच उत्पादन केलेल्या वस्तू परवडतात कारण त्यांच्या लोकांची कामगारांची उत्पादन क्षमता प्रचंड आहे सोबतच जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रांसपोर्टेशन च्या सुविधा या सर्वांमुळे भारतीय काय पण अमेरिकेतल्या कितीतरी कंपन्या जसे की एप्पल , ॲमेझॉन ही आपली प्रोडक्स चीन मधून बनवून घेतात तर भारतात ? एक किस्सा सांगतो धुळे शहरा जवळ मागच्या पंधरा वर्षापासून नरडाणा लगत एक एमायडिसी येऊ घातलेली आहे. प्रचंड मोठी जागा आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प या योजनेसाठी दिला गेला आहे. पाणी आहे, ट्रांसपोर्टेशन आहे परंतु एमआयडीसीचा काही विकास होत नाहीये. कारण जसे ही कुठली कंपनी मोठी व्हायला लागते तसेच स्थानिक मजूर कामगार लोकप्रतिनिधींना घेऊन जाऊन कधी पगार वाढीसाठी, कधी कामाच्या वेळा कमी करण्यासाठी, तर कधी भूमिपुत्रांनाच नोकरी देण्यासाठी आंदोलन करतात याला कंटाळून कितीतरी कंपन्या बंद पडल्यात किंवा थेट गुजरात मध्ये शिफ्ट झाल्यात आणि खानदेशात बेरोजगार तरुण तसेच राहिलेत याला जबाबदार आपली मानसिकताच नाही काय.हेच थोड्याफार फरकाने संपूर्ण भारतात होते आहे. सोबतच चीन मधून येणारा माल हा प्रचंड कस्टमच्या भ्रष्टाचारा सोबत भारतात येतो यात अधिकार्यांपासून तर स्थानिक दुकानदार पर्यंत सर्व लोक लोणी खातात शिवाय ग्राहकांनाही तो स्वस्तात मिळतो पण पैसा बुडतो तो देशाचा म्हणजे आपल्याच सगळ्यांचा हे आपल्याला कधी कळेल.
म्हणून सगळ्यात आधी राष्ट्रवाद वाढायला हवा
आपल्या भाषेपासून तर अस्मिते पर्यंत आणि नैतिक ते पासून तर व्यापार कौशल्या पर्यंतच शिक्षण शाळांमधून दिलं जायला हवं तेव्हा येणारी पिढी ही राष्ट्रवादाने आणि नैतिकतेने भरलेली असेल आणि भारत सामर्थ्यवान बनू शकेल. आज आपण चीन विरोधी देशभक्तीच्या पोस्ट टिक टॉक च्या चिनी एप'मधूनच पाहतो. तर काही ठिकाणी बँन चाईना झेंडे देखील मेड इन चायना असतात.
प्रत्येक भारतीयाला काही गोष्टी कंपल्सरी केल्याशिवाय सोडवत नाहीत हो. सॉक्रेटिस म्हणतो कधीकधी थोड्याप्रमाणातील हुकूमशाही ही लोकशाहीच्या ओव्हरडोस पेक्षा बरी असते . नाही मग लोकशाहीला सुखावलेले आणि गरिबांचा खरोखर कळवळा असलेले सरकार कसं बेजबाबदार आहे याचा सूर आवळतीलच. शिवाय प्रत्येक जातीचे धर्माचे वेगवेगळ्या नेते वेगवेगळी मते मांडतील खास आपल्या लोकांच्या फायद्यासाठी. परंतु माणसाला म्हणा की राष्ट्राला म्हणा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी , स्वाभिमानाने जगण्यासाठी, आपल्यावरील अन्याय सहन न करण्यासाठी, सुदृढ , ताकदवर असणं गरजेचं असतं आणि सुदृढतेसाठी शिस्त गरजेची असते जी प्रसंगी कठीण निर्णय घेऊनच बाणवावी लागते. सगळ्यात महत्वाचा म्हणजे
देशाने काय करावे यापेक्षा मी काय करतो आहे. नैतिकतेने जगतो आहे, कर प्रामाणिकपणे भरतो आहे, सार्वजनिक स्वच्छता बाळगतो आहे, देशासाठी मरणाऱ्या सैनिकांच्या मुलांसाठी काही दानधर्म करतो आहे, की फक्त व्हाट्अप फॉरवर्ड आणि फेसबुक पोस्ट वाचतो आहे आणि पुढे पाठवतो आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची...
कारण इंग्रजीत म्हण आहे
When you are not a part of solution then you are part of problem...
विनय पाटील... मुक्तछंद

Wednesday, 29 April 2020

लाजवाब इरफान



*लाजवाब इरफान*

_लेखक : विनय पाटील_

1994 -95 या काळात चंद्रकांता नावाची एक सिरीयल दूरदर्शन वर यायची. तिचा टुकार रिमेक काही वर्षांपूर्वी स्टार प्लस की सोनी कशावर तरी येऊन गेला या मूळच्या चंद्रकांता चा फार मोठा प्रभाव त्यावेळी आम्हा प्रार्थमिक शाळकरी मुलांवर होता. त्या सिरियल चे टायटल सॉंग , त्यात यक्कु म्हणणारा खलनायक इत्यादी आमच्यात फार लोकप्रिय होते पण या सर्वां सोबतच या मालिकेतल बद्रीनाथ नावाचं एक पात्र माझ्यासकट कितीतरी जणांच्या आज देखील लक्षात आहे. क्रिस गेल ठेवतो तसे लांब कुरळे केस काळा पोशाख असे त्याच स्वरूप असायचं. परंतु अभिनय कशाशी खातात हे न कळणाऱ्या त्या वयातही बद्रीनाथ चे जबरदस्त टप्पोरे डोळे टीव्हीच्या स्क्रीनमधून बाहेर येऊन आपल्याशी काही बोलत आहेत असे वाटायचे‌. पुढे ती सिरीयल बंद झाली आणि बद्रीनाथ देखील बरीच वर्ष दिसला नाही.
      २००६-०७ या वर्षी कॉलेजला असताना सहजच मुंबईला जाणं झालं होतं . तेव्हा मुंबईच्या मेट्रो सिनेमात नेमका लाईफ इन मेट्रो हा चित्रपट पाहण्यात आला आणि पाहतो तर काय 'बद्रीनाथ'. मी त्याला पाहताच सिनेमागृहात आनंदाने मित्राकडे पाहून ओरडलो अरे चंद्रकांता मधला बद्रीनाथ. अभिनेता आपल्या अभिनयातून जनमानसावर किती खोलवर छाप सोडत असतो याचे हे बोलके उदाहरण. मित्रांनो असा हा तब्बल दहा वर्षांनी सिनेमाच्या पडद्यावर भेटलेला बद्रीनाथ म्हणजे अभिनेता इरफान खान हे इतक्यात तुम्हाला कळलंच असेल. हा बद्रीनाथ म्हणजेच इरफान खान अनेक वेळा अनेक सिनेमातून भेटतच राहिला.
         विशाल भारद्वाज अधिक चांगला संगीतकार आहे की चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक हे ठरवणे तसं कठीण आहे. मोगली चार जंगल जंगल बात चली है पासुन ‌तर हैदर च्या अरिजित च्या आवाजातल्या गुलो मे रंग भरेपर्यंत अनेक जबरदस्त गाणी आणि कितीतरी अस्सल चित्रपट या  कलाकाराने दिलेले आहेत . शेक्सपिअरच्या नाटकांच्या प्रेमात पडलेला हा दिग्दर्शक 2004 झाली मॅकबेथ या शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित मकबुल हा सिनेमा घेऊन आला होता. पियुष मिष्रा, नसरुद्दीन शहा, पंकज कपूर, ओम पुरी ,तब्बू असे तगडे अभिनेते असलेल्या या चित्रपटाचं मुख्य पात्र होतं इरफान खान याच.  या दमदार अभिनेत्यांच्या गर्दीत देखील इरफान फार वेगळा भासतो (टीप कुण्यातरी महानुभावान मकबुल युट्युब वर टाकून ठेवला आहे जरूर बघा) त्यानंतर 2008 मध्ये तो भेटला स्लमडॉग मिलेनियर मधून एका पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात या चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल म्हणतो  *_He has an instructive way of finding moral centre of any character._* आणि character च moral centre साधण्याची हीच किमया इरफान कधी लाईफ ऑफ पाय मधून तर कधी लंच बॉक्स मधून साकारत आला आहे.
दरम्यान बिल्लू, गुंडे ,आण, तलवार असे कितीतरी पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट देखील त्याने केलेत परंतु साधारणपणे 2000 सालानंतर मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दिकी, केके मेनन ,राजकुमार राव ,पंकज त्रिपाठी ,पियुष मिष्रा अशा अभिनेत्यांनी आणि अनुराग कश्यप ,विशाल भारद्वाज, विक्रमादित्य मोटवानी, झोया अख्तर इम्तियाज अली अशा ताज्या दमाच्या दिग्दर्शकांनी व्यावसायिक आणि प्रायोगिक सिनेमातली भिंत उध्वस्त करण्याचे काम केलेले दिसते. जी भिंत 2000 साला पूर्वी फार ठळक आणि उंच भासायची आणि या या सर्व कलाकारात  इरफान खान हा थेट सलाम बॉम्बे पासून तर अंग्रेजी मिडीयम पर्यंत महत्वाचा शिलेदार राहिलेला आहे.
इरफान खान म्हणजे विलक्षण बोलके डोळे *_actor who talk with his eyes_* असं त्याच्याबद्दल कौतुकाने म्हटले जाते. आणि या  डोळ्यांच्या सोबतीला असतो तोंडातल्या तोंडात बरळल्यासारखी परंतु अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी संवादफेक, भाषेतल्या वेगळ्या लकबी . ही भाषेतली लकब उचलताना अभिनेता मुळात याच मातीत जन्माला आला असावा असा समज होण्याची शक्यता दाट असते. बहुतेक इरफानच एनएसडी कनेक्शन याला कारणीभूत असाव.
हल्लीच्या काळात त्याने हिंदी मिडीयम सारख्या चित्रपटातून जो सहजसुंदर अभिनय साकारला त्याने माझ्यासारखे कितीतरी लोक भारावून गेलेत आमच्यासारख्या प्रादेशिक भाषात शिकलेल्या परंतु आपल्या मुलांनी इंग्रजीतच शिकावं असा अट्टाहास बाळगणार्‍या पालकांच्या व्यक्तिमत्वातील विरोधाभास त्याने ज्या सहजतेने पकडला तो केवळ शब्दातीत आहे. इंग्रजी न येण्याचा न्यूनगंड आपल्या एकंदर अभिनयातून तो ज्या जिवंतपणे माडतो त्यातून या न्यूनगंडाच्या प्रेमात पडायला होतं. इरफान अतिशय सहजपणे आपली नाळ प्रेक्षकांची जोडतो , सर्वसामान्यांना तो आपल्यातलाच कुणीतरी वाटतो म्हणून वोडाफोन सारखी कंपनी इरफान खान आणि त्याची संवादफेक या भांडवलावर जाहिरात करते आणि कोट्यावधींचा धंदा करते.
        तिग्मांशू धुलिया (गँग्ज ऑफ वासेपूर मधला रामाधीर सिंग) याने 2003 साली हासिल या चित्रपटातून इरफानला संधी दिली होती. आशुतोष राणा आणि इरफान खान यांच्यातील अभिनयातली जुगलबंदी आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी राजकारण यावर बेतलेला हा सिनेमा अगदी अफलातून आहे. याच तिग्मांशु धुलियाने इरफान सोबत नंतर चरस आणि साहेब बीवी और गैंगस्टर सारखे बरेच सिनेमे केलेत परंतु 2012 सालि आलेला आणि इरफान च्या अभिनयाने सजलेला पानसिंग तोमर या चित्रपटाने इरफानला त्याच्या कारकिर्दीतले शिखर गाठुन दिले. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे .असे चित्रपट जर ऑस्करच्या नॉमिनेशन मध्ये असतील तर नक्कीच भारतातला ऑस्कर पुरस्कारांचा दुष्काळ संपू शकेल. कथानका पासून तर दिग्दर्शना पर्यंत आणि एडिटिंग पासून अभिनया पर्यंत सर्व काही या चित्रपटात अतिशय उच्च पातळीच आहे. या चित्रपटातला इरफानचा अभिनय म्हणजे रोलर कॉस्टर राईड आहे. सुदैवाने 2012 साली अलिगड मधील मनोज वाजपेयी च्या भूमिकेला टाळून तद्दन व्यावसायिक असलेल्या रुस्तम सिनेमातील अक्षय कुमारला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देणारी बुद्धिमान कलासक्त माणसे राष्ट्रीय पुरस्कार समितीवर नव्हती म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार इरफान च्या पदरात पडला. या चित्रपटातील चंबळ खोऱ्यातील हिंदीचा जो बाज इरफानने पकडला आहे तो ऐकावाच लागेल. बाकी शब्दात ती गोष्ट मांडणे मला शक्य वाटतं नाही. एवढेच कशाला हैदर मधला सुरुवातीच्या काही क्षणांसाठी येणाऱा आणि मोजून काही संवाद बोलून जाणाऱा इरफान चित्रपट संपेपर्यंत पाठ सोडत नाही.
     इरफानने हॉलिवूड मध्ये देखील एसीड फॅक्टरी , अमेजिंग स्पायडरमॅन असे बरेच सिनेमे केलेत . त्याचा हॉलीवूडचा आमिर खान म्हणजेच टॉम हँक्स सोबतचा इन्फर्नो देखील पाहण्याजोगा आहे . कदाचित आपण आज पसरलेल्या कोरोना विषाणूचीच गोष्ट चित्रपटातून पाहत आहोत अस आपल्याला वाटेल.
1993 यावर्षी स्टीव्हन स्पीलबर्गचा जुरासिक पार्क बघण्यासाठी आपल्या मित्राकडून उधार पैसे घेऊन गेलेला इरफान 2015 यावर्षी प्रदर्शित झालेल्या जुरासिक वर्ल्ड या चित्रपटात जुरासिक वर्ल्ड चा मालक आहे याला काय म्हणावं दैवी देणगी, प्रचंड परिश्रम की स्वतःवरील विश्वास.
क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की तुम्ही बॅट्समन प्रॅक्टिस करून बनू शकतात परंतु फास्ट बॉलर बनण्यासाठी तुम्हाला जन्मच घ्यावा लागतो. तसंच काहीसं कलेच्या बाबतीत असाव असं मला वाटतं. म्हणून कदाचित मेगास्टार च्या घरात जन्माला येऊन देखील आणि पंचवीस-तीस सिनेमे करून देखील एखादा अभिषेक बच्चन बनून राहतो आणि गावा खेड्यात जन्मलेले , वेटर, शिपाई बनून,  मजूरी करून जगलेली माणसं नवाजुद्दीन सिद्दिकी, मनोज वाजपेयी किंवा पंकज त्रिपाठी बनतात. इरफान ही असाच विना गॉड फादर चा जन्माला आला आणि अभिनयातला फादर म्हणावा अशी कारकीर्द गाजवून गेला. सध्या कोरोणा विषाणूच्या बातम्यांमुळे, दहशतीमुळे एक प्रकारची नकारात्मकता वातावरणात भरून राहिलेली आहे. त्यातून बाहेर पडण्याची पराकाष्टा होत असतानाच इरफान सारख्या अस्सल कलावंताच आणि जातिवंत अभिनेत्याचं जाण हे रात्रीचा काळोख गहिरा करणार आहे. इरफानच जाणं अगदी स्मिता पाटील, गुरुदत्त, संजीव कपूर यांच्या जाण्यासारखा आहे. त्यांच्या अवेळी जाण्याच्या जखमा आजही कितीतरी रसिकांच्या मनातून भळभळत आहेत. परंतु कलाकार असण्याच एक सौंदर्यही आहे . कलाकार हा आपल्या कलेतून नेहमीच जिवंत असतो आणि इरफान सारखा अस्सल अभिनेता मृत्यूपूर्वी कितीतरी आयुष्य जगून गेला आहे.
माझ्यातला शहाणा माणूस हे मान्य करतो आहे की जन्माला आलेल्या प्रत्येकालाच जायचं असतं तसंच इरफान गेला परंतु माझ्यातला लहान मुलगा हे मान्य करायला तयार होत नाहीये की चंद्रकांता मधल्या बद्रीनाथ कधी मरू शकतो
*इरफान तुला सलाम आहे..*

आपण लेखकाचे इतर लेखन खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकतात...

Friday, 23 November 2018

इन्सान खतरे मे है...

    लेखन : विनय पाटील
तुम्ही राजश्री प्रोडक्शन चे गीत  गाता चल, हम आपके है कोण, हम साथ साथ है, विवाह हे सिनिमे  पहिले असतील  तर
त्यात एकसारखे कथानक तुम्हाला दिसेल. संपूर्ण चित्रपटात अतिशय आनंदच वातावरण असत, सारखे कुठले न कुठले सोहळे साजरे होत असतात, एखाददुसर पात्र आणि अप्रिय घटना वगळता सारेच प्रेम आणि संस्कारांची मूर्तिमंत उदाहरण असतात. आणि चित्रपटातील ती अप्रिय घटना अतिशय थोड्या प्रयत्नाने दूर होते आणि शेवट पुन्हा गोड होतो. या चित्रपटांचा गोडवा एवढा असतो कि आपल्याला डायबेटिस होतो की काय अशी शंका यावी. या सर्वांची  आठवण मला हल्ली भारतीय टेलिव्हिजण मीडियावरील बातम्या पाहून येते आहे. गेल्या चार वर्षात भारतीय टेलिव्हिजण मीडियात विद्यमान सरकार संबंधातील बातम्या पाहून असे वाटते कि आपण कुठला राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट तर पाहत नाहीत. सार काही एवढे आलबेल आहे कि समोरची बातम्या सांगणारी व्यक्ती हि पत्रकार किंवा निवेदक आहे कि केंद्र सरकारचा कुणी प्रवक्ता बोलतो आहे अशी शंका यावी.
   आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे असतात कि जी स्थानिक , राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय मुदयावंर आपल्याला तावातावाने चर्चा करताना आढळतात. यातली बहुतेक सर्व मंडळी हि आपली मते हि मुख्यत्त्वे न्युज चॅनेल्स वरील बातम्या पाहून बनवत असते. जर शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ज्या पाण्याच्या टाकीत पाणी साचवते तेच पाणी दूषित असेल तर घराघरात पोहोचणारे ते पाणी पिऊन लोक आजारी पडणारच. न्युज चॅनेल्स च्या बातम्या अगदी एकांगी असल्याने त्या बघून तयार होणारी मते देखील पांगळी  असतात आणि अशी पांगळी मते घेऊन जगणाऱ्या जनतेला आणि त्या जनतेतल्या तथाकथित नेत्यांना बौद्धिक पगळेपण आल्याशिवाय कसे राहील. याचीच प्रचिती आपण सद्याचा विधानसभेच्या अधिवेशनात पाहत आहोत. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात तिसऱ्यांदा दुष्काळ पडला आहे. शेतीसाठी सोडाच परंतु बहुतेक गावात ऑक्टोबर महिन्यापासूनच पिण्यासाठी पाणी नाही अशा बिकट परिस्थितीत विधानसभा हि आरक्षणाच्या मुद्यावरून गाजते आहे कारण त्या मुद्यात सरकारसाठी आणि विरोधीपक्षांसाठी सत्तेची गणित दडलेली आहेत तार माध्यमांसाठी दडलेला आहे मसाला.
     काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सारी चॅनेल्स मंदिर मास्जिद्द वाद, संस्कृती रक्षण, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा सत्र घडवून आणतात. खेडे गावात किंवा शहरातल्या चाळीतून विलुप्त होत जाणारी कचाकचा भांडण्याची कला जोपासण्याचे संस्कृती रक्षणाचे काम हे न्युज चॅनेल्स मोट्या इमानदारीने करतं आहेत. त्यामानाने शिक्षणाचा खालावलेला दर्जा, महाग होत जाणाऱ्या आरोग्य सेवा, शेतकरी वर्गाची ढासळत  जाणारी परिस्थिती, बेरोजगारी यांसारखे प्रश्न त्यांच्या खिजगणतीतही नाही. कारण अशा मुद्यात मसाला नाही, त्या चर्चा बघणारा प्रेक्षक कुठल्याच बाजूचा नसतो. त्यामुळे त्याला माहिती मिळते परंतु त्याचा मनोरंजन होत नाही. त्यातून टी आर पी मिळत नाही. प्रेक्षकाना जे आवडते ते देण्याची वृत्ती या न्युज चॅनेलला मसाला चॅनेल बनविते, बिग बॉस के घर मे क्या हुवा , कपिल के किस्से , किंवा रिऍलिटी चेक याना आपण न्युज म्हणू शकतो का आणि मग प्रेक्षकही न्युज चॅनेल्स हि मनोरंजन म्हणूं पाहतात आणि त्यालाच बातम्या समजतात.
      मीडियाला खासकरून टेलिव्हिजण मीडियाला आपले स्वतःचे एक अर्थकारण आहे आणि जे चोवीस तास चालणाऱ्या चॅनेलसाठी कठीण होऊ पाहत आहेत हे जरी मान्य केले तरी. हि माध्यमे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहेत. सरकारी योजनां, त्यांचं कामकाजाचे आणि अंमलबजावणीचे तटस्थ विश्लेषन करण आणि त्यातून जनतेसमोर नेमकी बातमी ठेवणे हे या माध्यमाचा मुख्य कामात मोडते. हे देखील तेवढेच खरे आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे त्याचा शिक्षकांसोबत चांगले संबंध असू शाकतात. परंतु चांगला अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणे हे त्या विद्यार्त्याचे प्रथम कर्तव्य असायला हवे. केवळ आपल्या ओळखीच्या जोरावर विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेत अवघड वाटणारे प्रश्नच टाकू नये यासाठी  दबाव टाकला आणि शिक्षकानेहि अगदी तसेच केले तर. कदाचित तो विद्याथी परीक्षेत चांगले गुण मिळवून हुशार भासू शेकेल परंतु तो हुशार असेलच असे नाही. इतर (मॅनेज न होणाऱ्या) शिक्षकांनी त्याला थोडा देखील कठीण प्रश्न  विचारला तर त्या विद्यार्थ्यांची फजिती होईल. भारतातील विद्यमान सरकार आणि त्यांची बाजू मांडणारा पक्ष या विद्यार्थ्यांसारखा झाला आहे. हे विद्यार्थी एवढे मुजोर आहेत कि तुमचा प्रश्नच कसा चुकीचा आहे हे प्रश्न विचारणाऱ्याला ठणकावून सांगतात. अर्थात असले मुजोर विद्यारथी २०१४ पूर्वीही होते. दीर्घकाळच्या सत्तेतून  आलेला माज आणि मुजोरी याचे जिवंत उदाहरण असेलेले कपिल सिब्बल यांसारखे नेते देशाने यापूर्वीही अनुभवले आहेत आणी त्यातूनच २०१४ चे रामायण घडले आहे. परंतु यावेळी हि मुजोरी प्रश्न विचारणारी प्रणालीच मोडून टाकण्यापर्यंत गेली आहे.
     जे कुणे या प्रकारात समाविष्ट होण्यासाठी नकार देतात त्यांच्यवर शक्य त्याप्रकारे दबाव टाकला जातो. त्यांना सोशिल मीडिया वरून ट्रॉल केले जाते, त्यांच्या बदनामीसाठी सोशल मीडिया आर्मी सज्ज असते. अनेक दशकांपासून पत्रकारितेत असलेले पुण्य प्रसून वाजपेयी , रवीश कुमार, अभिसर शर्मा हि अशीच काही टेलिव्हिजण मीडियातली नावे . हि सर्वच मंडळी काँग्रेस शासनाच्या काळातही सरकारवर टीका करायची त्यांना कठीण प्रश्न विचारायची तेव्हा ते सन्माननीय पत्रकार होते परतू हीच गोष्ट विद्यमान सरकारच्या काळात ते करू लागले तेव्हा त्यांना देशद्रोही म्हणून प्रसारित करण्यात आले. त्यांच्या कार्यक्रमात भा.जा.प च्या प्रवक्त्यांनी जाणे बंद केले. त्यांना काँग्रेस चे चमचे म्हणूंन हिणविण्यात आले. एवढंच पुरेस नव्हते म्हणून कि काय NDTV  च्या प्रसरणावर विद्यमान सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने राष्टीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत एका दिवसाची बंदी लावून पुन्हा काही काळ आणीबाणीची आठवण करून दिली. आणि काही दिवसनपूर्वीच पुण्य प्रसून जोशी याना ABP न्युज चॅनेल मधून बाहेर पडण्यासाठी दबाव आणला गेला या साऱ्या घटना लोकशाहीचा डंका वाजविणाऱ्या शासनाने हुकूमशाही पद्धतीने आमलात आणल्या.
   आम्हाला पूरक असेलेली मते असणारे सर्वच देशप्रेमी आणि थोडा वेगळा विचार मांडणारे , प्रश्न विचारणारे सगळेच देशद्रोही हे कुठेले मापदंड सरकार लावू पाहत आहे कुणास ठाऊक. याच महिन्यात माननीय पंतप्रधान मोदीजींनी मन कि बात या कार्यक्रमचा ५० व्या भागातून जनतेशी संवाद साधला. खरेतर असा संवाद साधण्याची कला आणि रेडिओचा एवढा प्रभावी वापर कुठल्याच भारतिय नेत्याने  केलेला नाही. परंतु याला सवांद म्हणावे का कारण हे उद्बोधन एकतर्फी असते. मन कि बात या कार्यक्रमातून , गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून ,अनेक सभा संमेलनातून माननीय पंतप्रधानांनी जनतेशी यापूर्वी कुणीही साधला नसेल एव्हढा सवांद साधला आहे. परंतु या चार वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही आणि ज्या काही दोनचार मुलाखती न्युज चॅनेल्स ला दिल्या त्या कुणाला दिल्या आणी त्यातील प्रश्न कुतूहल असेलल्या वाचकांना youtube वर सहज बघायला मिळतील.
    सरकारच्या निती योग्य आहेत कि अयोग्य , कारभार पारदर्शक कि अपारदर्शक , कार्यकाळ समाधानकारक कि असमाधानकारक हा माझा लेखनाचा विषय नाही, तेव्हढा माझा अभ्यास नाही आणि काही मत असलीच तर ती माझी वैयक्तिक  मते आहेत. परंतु ती मते मी आणि माझ्यासारखे सामान्य माणसे ज्या माध्यमातून बनवितात त्या माध्यमांची गळचेपी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कदापि मान्य होणार नाही. हीच घुसमट या लेखामागची प्रेरणा आहे.
    बऱ्याच वाचकांना असा प्रश्न पडला असेल कि तुम्ही या सरकारलाच का दोष देता. मागील ६० वर्षात काँग्रेस ने जे केले त्या बद्दल तुम्ही का नाही बोलत . तर त्या सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो कि समजा तुम्ही शान हा चित्रपट पाहत आहात. हा चित्रपट चालू असताना  चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन अचानक शानच्या  फ्रेम मधून बाहेर पडून शोलेच्या फ्रेममध्ये शिरून गब्बरसिंगला हाणत नाही. चित्रपट जर शान असेल तर गोष्ट हि शान मधल्या शाकालचीच व्हायला हवी शोले मधल्या गब्बरची नाही म्हणून सध्या देशातील विद्यमान सरकारलाच प्रश्न विचारले जातील . तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांवर किंवा केलेल्या टीकेवर तुम्ही काँग्रेस च्या काळात कुठे होतात हा प्रश्न उत्तर होऊ शकत नाही. काँग्रेस शासनाच्या काळातही दबावतंत्राचा वापर होतहोताच परंतु माध्यमांच्या मुस्कटदाबीचा जो प्रकार विद्यमान सरकार चालवते आहे त्यातून पुढे इतर पक्षही धडा घेणार नाहीत हे कशावरून.
    बट्राड रसेल यांचं एक अप्रतिम वाक्य आहे . ते म्हणतात In democracy the fools have right to vote & in dictatorship the fools have right to rule. आपल्या सुदैवाने आपल्या पूर्वजांनी पहिल्या प्रकारची शासनव्यवस्था स्वीकारली आहे. ज्यात कुणी मुर्ख असो कि हुशार प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार आहे आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारून आपले मत बनविण्याचा अधिकार आहे . परंतु  कुणी  जर तुमच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावरच गंडांतर आणत असेल तर ...
  मुझे मालूम नहि के हिंदू खतरेमे है , या मुसलमान खतरे मे है   
  अगर सवाल पुच्छना मना है तो जरूर इन्सान खतरे मै है  

Saturday, 17 November 2018

नलीच्या निमित्ताने


"कवळ्या नजरेची कवळी कळी पोर
कवळ्या  डोळ्यातील कवळी भिरभिर
कवळ्या पिरतीच्या कवळ्या खाणाखुणा
कवळ्या हातावर कवळा कात चुना "

    कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या ओळी, लेखक मिलिंद बोकील यांची शाळा हि कादंबरी किंवा श्रीकांत देशमुख लिखित नली हे नाटक या सर्वात मला एक सामान धागा जाणवतो. स्वातंत्र्यानंतर  खेडेगावातील घरातून शिक्षण घेणारी हि पहिली पिढी  आणि त्या पिढीच्या बालपणातील तसेच बालमानांतील खोलवर कप्यात दडून बसलेल्या, वेणीफणी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकणाऱ्या त्यांच्यासोबतच्या अल्लड पोरी .या मनात दडून बसलेल्या पोरिनीच या पिढीतील काही तरुणांना लिहीत केलं बोलत केलं. ज्यातून मातीतून आलेल्या या माणसांनी मातीतल्या कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्यात आणि तुम्हा अम्हासारख्याना त्या प्रचंड भावल्यात कारण आपण कुठेतरी आपलीच गोष्ट ऐकत असल्याची अनुभूती या साहित्याने आपल्याला दिली. कांहीस असाच भारून टाकणारा अनुभव काल जळगावच्या परिवर्तन या संस्थेंच्या नली या नाटकातून मिळाला तो काहीअंशी तुमच्याशी वाटून घ्यावा  म्हणून हा लेखनप्रपंच.
      नली हे एकलनाट्य श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारलेले आहे. मागील अनेक वर्षांपासून जळगाव शहरात परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून  सांस्कृतिक परिवर्तनाचा रथ हाकणारे जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांची हि संकल्पना. यांचं सांस्कृतिक परिवर्तनाचे आणि त्यातून होणाऱ्या मंथनाचे थोडेफार तुषार खान्देशातील इतर शहरावर उडताहेत त्याचाच परिपाक म्हणजे धुळे शहरात काल झालेला नली या नाटकाचा प्रयोग. या नाटकाचे दिग्दर्शन योगेश पाटील या नव्या दमाच्या तरुणाने केलेले आहे. मुळातूनच खेड्यतून आलेला हा तरुण या नाटकाच्या माध्यमातून जे इरसाल ग्रामीण रंग या नाटकात भरतो ते वाखाणण्या जोगे आहे. एकलनाट्या हा एकपात्री प्रयोगच असतो यात आपल्या अभिनयातून सर्वच पात्र उभी करण्याची क्षमता आणि प्रतिभा अभिनेत्यात असायला हवी. विविध भूमिकांचं नेमकं अवलोकन, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास, ग्रामीण त्यातही तावडी आणि अहिराणी या भाषांवरची पकड  आणि क्षणात बदलणारी व्यक्तिरेखा या साऱ्या गोष्टी आपल्या अभिनयातून जिवंत करणारा अभिनेता म्हणजे  हर्षल पाटील. या तरुण अभिनेत्याचा रंगमंचावरचा सहज वावर आणि आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. हे कुठेले नाटक नसून  गावात कुठेतरी मारुतीच्या देवळावर, शाळेत, विहिरीच्या वाटेवर रोज घडणारे संवाद आहेत असाच भास होत राहतो. आपल्या विलक्षण बोलक्या डोळ्यांनी हर्षल या दहा ते बारा व्यक्तिरेखा लीलया साकारतो. कधी मनमुराद हसवतो तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणायला भाग पाडतो. हर्षल चा हा अभिनय सहज आहे त्यात कुठलाही अविर्भाव नाही ज्यातून आपण नाटकाच्या अजून जवळ जाऊन पोहचतो.
   आपल्यासोबत शाळेत शिकत असलेल्या पोरींचे नेमके काय झाले असेल हा प्रश्न फेसबुक आणि व्हाट्सअँप सारखा सोशल मीडिया नसताना शिकून तरुण झालेल्या संपूर्ण पिढीला सतावत आला आहे .त्यातल्या त्यात मोठ्यघरातल्या किंवा लग्न करून मोठया घरी गेलेल्या काही मुली सुखवस्तू झाल्या असतीलही परंतु शेतात राबणाऱ्या , दिवसभर गुरांमागे फिरणाऱ्या , विहिरीवरून पाणी आणणाऱ्या आणि मधेच शिक्षण सुटलेल्या पोरींची सगळी पिढी काळाच्या  कप्यात कुठे गडप झाली आणि आज देखील होते आहे हा अस्वस्थ करणारा प्रश्न काही केल्या पाठ सोडत नाही.   एकार्थाने त्यांचं असे नाहीसे होणे हे दुःखद असेल हि परंतु जेव्हा नली हि नाटकातल्या बाळूला आयुष्याच्या प्रेत्येक टप्यावर भेटत राहते तेव्हा शाळेनंतरचे तिचे भेटणेही कुठे आनंददायी  असते. शेवटी मातीतल्या या मुलींचे  माती  होऊन जाणे हि घटना कुठे सुखावणारी आहे. आज शेतकऱ्यांच्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतात कारण त्यांना शहरात जाण्याची आणि सुखात राहण्याची इच्छा असेलही पण त्या पेक्षाही त्यांना नको असत ते असं झुरत झुरत मातील मिसळून जाणं.
   नाटक या कलाप्रकाराचे वगेळेपण म्हणजे हि एक जिवंत कला आहे. नाटकाचा अनुभव हा नाट्यगृहातूनच मिळू शकतो. कितीही ताकदीच्या अभिनेत्यांचा कितीही चांगला अभिनय पडद्यावर दिसत असला तरी प्रत्यक्ष रसिकांच्या समोर उभं राहून नाटक सादर करण्याची सर त्याला येणार नाही आणि बहुतेक म्हणूनच नसरुद्दीन शाह सारख्या अनेक  सिनेमातल्या नवलजेलेल्या अभिनेत्यांना  नाटक करण्याचा मोह अजून हि सुटत नाही. नाटकासारख्या अलौकिक कलेला हल्ली चांगले दिवस नाहीत. या क्षेत्रातील कलावंतांना स्वतःच्या मेहेनतीने नाटक उभं करावं लागत आणि नंतर काही ठिकाणी ते बघण्यासाठी प्रेक्षक हि शोधावे लागतात. या सर्वामागे आमच्यासाखे उदासीन रसिक जबादार आहेत कि फक्त हसवणूक आणि त्यातून प्रेक्षकांची फसवणूक करणारी नाटके आणि नाट्यसंथा जबाबदार आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु यामुळे आजच्या पिढीचे सांस्कृतिक , बौद्धिक कुपोषण होत आहे हे मात्र नक्की. परिवर्तन सारखी संस्था हि कोंडी फोडू पाहत आहे आणि नली सारखा प्रयॊग हि त्यांनी मारलेली  मुसंडी आहे हे माहे प्रामाणिक मत आहे.
   हे नाटक ज्या जेष्ठ रंगकर्मी यादव खैरनार याच्या स्मृतिमोह्त्सवाच्या निमित्तानं अनुभवयाला मिळाले त्या यादव दादांचे,सौ रंजना खैरनार ताईचे , खैरनार परिवाराचे,  तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे , मानवता बहुउद्देशीय विकास संस्था धुळे, लोकमंगल कलाविष्कार संस्था , मॅड स्टुडिओ ,महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या ,आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या सर्व नाट्यसवेकांचे आणि धुळ्यात खासकरून  नाटक रुजविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणाऱ्या संदीप पाचंगे , मुकेश काळे या नाट्यवेड्याचे धुळेकर  रसिकांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद .
                                        विनय पाटील, धुळे 

Sunday, 15 April 2018

कविता बिवीता.. असिफा

मला माफ करा परंतु क्रुपया कुणी
त्या आठ वर्षे वयाच्या मुलीचा उल्लेख करूच नका...

क्रुपया कुणी ही आपला डि पी काळा ठेऊ नका किंवा त्या रेपच्या घटनेची पोस्ट पूढे पाठवू नका

काय आहे आपण अस करुन आपला सात्विक संताप व्यक्त करतात हे खरय परंतु तुमच अस करण्याने मला सारखी सारखी ती चिमुरडी आठवत रहाते

माझा पिछाच सोडत नाहीये ती चालतांना, वाचतांना, बोलतांना, विचार करतांना ...

तीच्या डोळ्यात सारखी मला माझीच मुलगी, बहीण, आई दिसत असते जी विचारत असते मला मानवी संभ्यता या शब्दाचा अर्थ

आणि जातीचा, धर्माचा, राष्टाचा अभिमान बाळगनारा मी तिला प्रचंड आपराधी पणाच्या भावनेने सांगतो


आज मला खरोखरच लाज वाटते आहे माझ्या माणूस असण्याची...

Friday, 30 March 2018

महायुद्धांच्या चित्रकृती भाग २: खिरस्तोफर नोलन आणि डंकर्क...

       इंग्रजि साहित्यात पदवी घेत असलेला एक ब्रिटिश विद्यार्थी १९९२ सालच्या सुट्यांमध्ये आपली मैत्रीण इम्मा थॉमस  आणि आणखी एका मित्रांसोबत इंग्लंडहुन फ्रान्सला  बोटेने निघाला होता. बोटेच्या डेकवरून जसे  त्यांना शहर दिसू लागले तसे त्याची मैत्रीण आनंदाने ओरडली 'डंकर्क'. कुठल्याही मराठी माणसाला रायगड असे म्हटल्यावर जे काही होते तसेच काहीतरी नातं ब्रिटिशांचे  डंकर्क या ठिकाणाशी आहे. मुळात फ्रान्सच्या किनाऱ्यावरील हे एक शहर ब्रिटिशांची अस्मिता, पराक्रम आणि लढाऊवृत्ती यांचे कारण कसे ठरू शकते याची पाळेमुळे दुसऱ्या महायुद्धात आहेत.अस्मिता,राष्टप्रेम आणि गौरवशाली इतिहास या साऱ्यांच्या व्यतिरिक्त त्या  तरुणाच्या मनात त्या क्षणी अजून काहीतरी आले. कल्पकता ,प्रयोगशीलता आणि महत्वाकांक्षा यांचा मिलाफ असलेला तो तरुण येणार्र्या शतकातला एक  महत्वाचा चित्रपट दिग्दर्शक होता.ज्याला फ्रान्सच्या किनाऱ्यावरील '
डंकर्क' हे शहर बघून त्या दिवशी  एका चित्रपटाची कल्पना सुचली होती. २०१८ सालच्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवणारा तो चित्रपट म्हेणजे डंकर्क आणि त्या बोटेवरचा तो प्रतिभावान तरुण म्हणजे जागतिक सिनेमात प्रयोगशीलतेसाठी ओळखला जाणार दिग्दर्शक 'खिरस्तोफर नोलन'.
        हॉलिवूडच्या सिनेमात रस असणाऱ्यांना ख्रिस्तोफर नोलन हे नाव तसे नवे नाही. मोमेंटो ( ज्यावर अमीर खानचा गजनी बेताल होता) द प्रेस्टिज, इनसेप्शन, द डार्क नाईट, इंटरस्टेलर असे अनेक कल्पकता ,प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतले  मैलाचे दगड ठरलेल्या चित्रपटांचा तो कर्ता आहे.  त्याची ओळख सांगण्यासाठी एवढे पुरेसे आहे. नोलनच्या चित्रपटांची संपूर्ण जगात अतिशय आतुरतेने वाट पहिली जाते फक्त सिनेरसिकच नव्हे  तर अनेक समीक्षक देखील त्याच्या चित्रपटाचे चाहते आहेत परंतु ऐतिहासिक घटनेवर चित्रपट बनविण्याचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता.
         १९३९ ते १९४५ दरम्यान लढल्या गेलेल्या दुसऱ्या महायुद्धातल्या २६ जुन ते ४ मे १९४० दरम्यान घडलेल्या एका प्रसंगावर हा सिनेमा बेतलेला आहे. नाझी सैन्याच्या जोरदार मुसंडी पुढे टिकू न शकलेल्या दोस्त राष्ट्राच्या फौजा डंकर्क या फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका शहरात एकवटलेल्या आहेत. दोस्त राष्ट्रांच्या सुमारे चार लाख सैनिकांना नाझी फौजेने जमिनीच्या बाजूने घेरलेले आहे .नाझी सैन्याच्या हाती लागण्यापूर्वी समुद्रमार्गे या सैन्याला नागरी बोटांमधून इंग्लंडमध्ये नेण्याचा प्रसंगाला इतिहासात डंकर्कची यशस्वी माघार म्हणून संबोधले जाते. महायुद्धाच्या सुरवातीसच जर एवढे मोठे सैन्य हिटलरच्या हाती लागले असते तर कदाचित दुसऱ्यामहायुद्धाचा आणि जगाचा इतिहास हा वेगळा असता.म्हणूनच डंकर्कची यशस्वी माघार हि जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी मह्तवपूर्ण घटना म्हणून ओळखली जाते.   
       ख्रिस्तोफर  नोलेनचे चित्रपट हे एकाच प्रयत्नात काळतील असे मुळीच नसतात. त्याच्या चित्रपटाची कथा कधीही एका सरळ रेषेत प्रवास करीत नाही तर आढेवेढे घेत जाते आणि अधिक गुंतागुंतीची असते .शिवाय Timespace म्हेणजेच काळ आणि वेळ हि देखील त्याचा चित्रपटात एकाचवेगाने प्रवास करताना आढळून येत नाही. खासकरून वेळ ह्या चौथ्या मितीचा त्याचा चित्रपटातला वापर हि गोष्ट प्रेक्षकांना चक्रावून सोडते.खासकरून इनसेप्शन, इंटरस्टेलर आणि डंकर्क या चित्रपटातला त्याने वेळेचा केलेले वापर त्याचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. नोलन प्रेक्षकांना कधीच गृहीत धरत नाही आणि प्रेक्षकांना काहीही रेडिमेड देणे देखील टाळतो.डंकर्क हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल.
        हा चित्रपट एकाच वेळी  हेवेत ,पाण्यात आणि जमिनीवरील  तीन वेवेगळ्या घटनांना सोबत घेऊन चालतो .या तीनही घटनांचा एकदुसरीशी संबंध आहे परंतु त्या घटनांतील वेवेगळ्या वेळांमध्ये घडणारे प्रसंग नोलन प्रेक्षकांसमोर मांडतो आणि त्या सर्व प्रसंगांचा संबंध जोडून त्यांचा अर्थे समजावून घेण्याची जबाबदारी पुर्नपणे प्रेक्षकांची असते. प्रेक्षकांना बौद्धिक कसरत करायला लावणे हि नोलनच्या दिग्दर्शनाची खासियत आहे.याच कारणामुळे त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिल्यास वेगवेगळे संदर्भ स्पष्ट होत जातात.
          नोलनचा आणखी एक महत्वाचा दिगदर्शकीय पैलू म्हणजे त्याचा चित्रपटातील पात्रांना तो नेहमी काहीं कठीण पर्याय देऊन त्यातून एकाची निवड करण्यास भाग पाडीत असतो. त्याच्या बहुतेक चित्रपटाचा तोच लेखक किंवा सहलेखक असल्यामुळे चित्रपटात असे निर्णयाचे प्रसंग उभे करण हे त्याला आवडते हे स्पष्ट होत. डंकर्क या चित्रपटात रॉयल नेव्हीच्या  स्पिटफायटर विमानात फक्त एक तास पुरेल एवढंच इंधन शिल्लक असताना दोस्त राष्ट्रांच्या फौजांना जर्मन बॉम्बर्स विमानांकडून   चिरडले जाऊ द्यायचे कि परतीचे सर्व मार्ग बंद करून लढत राहायचे याचा निर्णय वैमानिक असलेल्या टॉम हार्डी याला घ्यायचा असतो तर आपल्या बोटीत मरणाच्या तोडांत असलेल्या मदतनीस म्हणून आलेल्या मुलाला वाचवण्यासाठी परत फिरावे कि पाण्यात बुडून मारणाऱ्या सैनिकांना वाचवण्यासाठी पुढे जावे याचा निर्णय नागरी बोटीचा मालक असेलेल्या मार्क राईलान्स याला घ्यायचा असतो. असेच प्रसंग त्याचा इतर चित्रपटातही दिसतात .अशा प्रसंगातून श्रेयस आणि प्रेयसाच्या निवडीतला संघर्ष उभा करण हे नोलनला आवडते.
              आपला चित्रपट वास्तवाच्या अधीक जवळ घेऊन जाण्यासाठी जागतिक सिनेमातील काही दिगदर्शक कमालीचे बांधील असतात .नोलन हा त्यातलाच एक आहे,म्हणून डंकर्क मध्ये कधी विमानांमधील युद्ध दाखविताना तो खर्या फायटर विमानात अभिनेत्याला बसवून आणि फ्रंट तसेच रेअर कॅमेरा लावून टनेल इफेक्ट मिळवतो तर कधी डंकर्कच्या मोहिमेत खरोखर सहभागी झालेल्या नागरी बोटींना मिळवून पुन्हा चित्रीकरणासाठी वापरतो .चित्रपटाच्या बारकाव्यातून आणि सूचक प्रतिमेतून परिणाम साध्य करण्याची विलक्षण हातोटी असेलेले असे काही दिगदशक आज आपल्याला जागतिक सिनेमात पाहायला मिळतात.
    या चित्रपटातले सवांद अतिशय नेमके आहेत आणि संवादाहूनही त्यात येणारे पॉज हे अधिक काही सांगत असतात. उदाहरण म्हणजे जेव्हा ब्रिटिश नागरी नौका डंकर्कच्या किनाऱ्यावर सैनिकांना घेण्यासाठी येताना नेव्ही कमांडर बाल्टन याला दुर्बिणीतून दिसतात तेव्हा तो आपल्या सहकारी फ्रेंच अधिकाऱ्याला म्हणतो " You can particularly see it from here   ....home "  . दुसऱ्या एका प्रसंगात इंग्लंडच्या किनाऱ्यावर सुखरूप परतलेल्या सैनिकांना एक अन्धवृद्ध व्यक्ती ब्लॅंकेट वाटत  वेल डन म्हणत असते. तेव्हा अॅलेक्स नावाचा सैनिक त्याला म्हणतो "  All we did is survive  "  हे ऐकून तो वृद्ध उद्गारतो " That's enough " . मुळात युद्धेशास्राच्या नियमाप्रमाणे डंकर्कची माघार हा ब्रिटिशांचा मोठा पराभव होता आणि १९४२ सालच्या सिंगापूरचा पडावापर्यंत तो खोरोखऱ पराभव समजला जात होता परंतु सर्वसामान्यांसाठी  एवढ्या सैनिकांचे वाचलेले प्राण हि घटना नैतिक विजयाची होती आणि याच नैतिक विजयाचा डंका वाजवून ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी सैन्याचं आणि नागरिकांचे मनोधिर्य कमालीचे उंचावले होते.जे दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांच्या विजयमागचे एक महत्वाचे करण होते.
            या संपूर्ण चित्रपटात कुठेही, जर्मन रणगाडे,नाझी सैनिक त्यांचा हिंसाचार इत्यादी दिसत नाही .शत्रूची अचानक येणारी बॉम्बर विमाने ती देखील लॉन्ग शार्टमध्ये आणि त्यांचं आवाज तसेच चित्रपटाला हॅन्स झिम्मर याचे पार्शवसंगीत आणि परतीच्या वाटेकडे अगतिकपणे पाहनारे सैनिक यांच्याच वापराने अपेक्षित परिणाम साधला जातो. सोबतीला असते ती अचंबित करणारी सिनेमॅटोग्राफी, जी  नोलानच्या चित्रपटांचा आत्मा असते. सिनेमॅटोग्राफी आणि प्रतिमांचा प्रभावी वापर करून नोलन आपल्याला थेट युद्धभूमीतच नेवून सोडतो, म्हणून शक्य असल्यास त्याचे चित्रपट हे सिनेमागृहातच पाहावेत.     
       काही जाणकारांच्या मते डंकर्क हा ख्रिस्तोफर नोलनचा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे .स्वतः नोलन म्हणतो कि या चित्रपटात मी खूप जास्त प्रोयोग केले आहेत. बहुतेक यामुळेच ९० व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये डंकर्कला सर्वोत्तम दिग्दर्शकासह  तब्ब्ल ८ नामांकने मिळाली होती ज्यात बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट फिल्म एडिटिंग आणि बेस्ट साऊंड मिक्सिग या  विभागात हा चित्रपट पुरस्कार पटकाविण्यात यशस्वी ठरला. २०१८ सालच्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारांची विशेष बाब म्हणजे डंकर्कच्या घटनेचे सूत्रधार तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या जीवनातील दुसऱ्या महायुद्धवर आधारित The darkest hour या चित्रपटातील अभिनयासाठी गॅरी ओल्डमॅन या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हि घटना आज ७३ वर्षांनंतरही जागतिक सिनेमावर असेलेला दुसऱ्या  महायुद्धाचा प्रभाव विशद करते.   
    चार्ल्स रॉबर्ट डार्विन या महान जीवशास्र्ज्ञाने सांगितले आहे कि काहीही करून आपले अस्तित्व टिकऊन ठेवणे आणि ते टिकविण्यासाठी उत्क्रांत होणे हि सजीवांच्या जगण्याची दोन महत्वाची प्रयोजने आहेत. म्हणूनच निसर्ग नियमाप्रमाणे प्राणी आणि मनुष्य जिवंत राहण्यासाठी शक्य ते सर्व करतात .फरक एवढाच असतो कि प्राण्यान्माधले हे survival शक्तीने किंवा युक्तीने होत असते तर माणसांमध्ये शक्ती ,युक्ती, राजकारण ,अर्थकारण, समाजकारण, आणि प्रसंगी स्वतःचे प्राण धोक्यात घालून इतरांना वाचवण्याइतपत टोकाची मानवी संवेदना या साऱ्यावर अवलंबून असते.जी प्रेक्षकांना या चित्रपटात रॉयल एअर फोर्स च्या वैमानिकात,अखेरच्या फ्रेंच सैनिकांसाठी डंकर्कवर थांबलेल्या नेव्हल  कमांडरमध्ये आणि आपल्या नागरी बोटी घेऊन युद्धात अडकलेल्या सैनिकांना न्यायला आलेल्या ब्रिटिश नागरिकांमध्ये पाहायला मिळते.
          एका प्रचंड मोठ्या मानवी समूहांची जिवंत राहण्यसाठीच्या संघर्षची गोष्ट सांगणारा आणि सोबतच युद्धाचे भयाण वास्तव मांडणारा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा  आवर्जून पाहावा असा चित्रपट  "डंकर्क..."   

विनय पाटिल... दिनांक 30 मार्च 2018

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...